
संदीप घोरपडे यांचे प्रतिपादन – स्वातंत्र्य दिनी प्रकाशन सोहळा संपन्न
अमळनेर (अटकाव न्यूज ) :–
“उमलत्या वयातील मुलामुलींना स्वतःच्या शरीराबद्दल पडणाऱ्या प्रश्नांची योग्य, शास्त्रीय उत्तरे वेळेत मिळाली नाहीत, तर त्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात येते. हे टाळण्यासाठी सोप्या भाषेत लैंगिक शिक्षण देणारी ‘तिमिरातुनी तेजाकडे’ ही पुस्तिका निश्चितच मार्गदर्शक ठरेल,” असे प्रतिपादन समाजसेवक संदीप घोरपडे यांनी केले.
साने गुरुजी विद्यालय, अमळनेर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रसिध्द स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जयेश शिंदे लिखित ‘तिमिरातुनी तेजाकडे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
✦ सामाजिक वास्तवावर थेट भाष्य
घोरपडे पुढे म्हणाले की, “आज जगभर हिंसकतेचा उद्रेक होताना दिसतो. यामध्ये सोशल मीडियाचा वाढता वापर मोठी भूमिका बजावत आहे. किशोरवयात स्वाभाविकपणे जागृत होणाऱ्या लैंगिक भावनांवर अश्लील रील्स, पॉर्न फिल्म्स यांचा विपरीत परिणाम होतो. जसे रासायनिक खतांनी पिके अवेळी तयार होतात, तसेच सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे अल्पवयीन मुले-मुली तारुण्याच्या उंबरठ्यावर लवकर पोहोचतात. संस्कृतीच्या नावाखाली अज्ञानात राहणारे तरुण विकृत दृष्टीकोनातून लैंगिकतेकडे पाहू लागतात. अशा सर्व प्रश्नांना शंभर टक्के शास्त्रशुद्ध उत्तरे या पुस्तकात मिळतील.”
✦ मान्यवरांची उपस्थिती
या प्रकाशन सोहळ्यास पुस्तकाला शब्दबद्ध करणारे धनंजय सोनार, डॉ. प्रतिज्ञा शिंदे, हेमकांत पाटील, कस्तुरी प्रकाशनचे गोकुळ बागुल, माजी मुख्याध्यापक सतीश देशमुख, पत्रकार किरण पाटील, मगन पाटील, भास्कर बोरसे, प्रभाकर गुरुजी, शकील शेख, महाजन मॅडम, बोरसे मॅडम, तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✦ कार्यक्रमाचे संयोजन
प्रास्ताविक संजीव पाटील यांनी केले, सूत्रसंचालन रत्नपारखी यांनी तर आभार प्रदर्शन बापूराव ठाकरे यांनी केले.
‘तिमिरातुनी तेजाकडे’ ही पुस्तिका उमलत्या पिढीला वास्तवतेचा मार्ग दाखवून आरोग्यदायी समाज घडविण्यात मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.









