
अमळनेर ता.शिरूड | अटकाव न्यूज
प्रत्येक व्यक्तीमध्ये काही कमजोरी व काही बलस्थाने असतात. मात्र अनेकजण आपल्या कमजोरींच्या न्यूनगंडामुळे मानसिक तणावात राहून प्रगतीपासून दूर जातात. परंतु कमजोरीलाच आपले बलस्थान बनविण्याचे कौशल्य आत्मसात केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन खानदेश साहित्य संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी. ए. धनगर यांनी केले.
ते व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरूड येथे आयोजित दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक शालेय समितीच्या चेअरमन श्रीमती पुष्पलता अशोक पाटील होत्या. व्यासपीठावर शालेय समिती सदस्य वसंत भगवान पाटील व पुंजू एकोबा पाटील उपस्थित होते.
धनगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जीवनात संघर्ष अपरिहार्य आहे. अपयशातूनच यशाचा मार्ग सापडतो. सकारात्मक दृष्टिकोन, परिश्रम व आत्मविश्वास यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थी उज्ज्वल भवितव्य घडवू शकतो. दहावीचा निरोप समारंभ म्हणजे दुग्धशर्करा योग असून, शाळेचे संस्कार घेऊन आता विद्यार्थी जगाच्या विस्तीर्ण अवकाशात प्रवेश करणार आहेत. महाविद्यालयीन जीवनात विविध क्षेत्रांत स्वतःची छाप उमटविण्याची संधी विद्यार्थ्यांसमोर आहे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच शाळेला भेटवस्तू देऊन ऋणनिर्देश व्यक्त करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम भावनिक व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
यावेळी मुख्याध्यापक अनिल शिवाजी पाटील यांच्यासह पी. जे. निकम, सविता बोरसे, गुलाब बोरसे, जाधव, योगिता देशमुख, भूषण सोनवणे, संजय पाटील, अरुण पाटील व राहुल लांडगे आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी भूषण वानखेडे व प्रज्ञावती रविंद्र बैसाणे यांनी केले. प्रस्तावना श्री. गुलाब बोरसे सर यांनी मांडली.








