अमळनेर तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचा दुहेरी आधार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

39,541 शेतकऱ्यांना 19 कोटी 80 लाखांची नुकसानभरपाई; रब्बी हंगामासाठी हेक्टरी 10 हजारांची अतिरिक्त मदत
– माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील

अमळनेर :-
अमळनेर तालुक्यात ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या मुसळधार अतिवृष्टीसह वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना राज्य शासनाकडून दुहेरी आर्थिक आधार देण्यात आला असून, सुमारे 39 हजार 541 शेतकऱ्यांना एकूण 19 कोटी 80 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. तसेच खरीप हंगाम पूर्णतः वाया गेल्याने रब्बी हंगामासाठी बियाणे खरेदीसाठी हेक्टरी 10 हजार रुपयांची अतिरिक्त मदत मंजूर करण्यात आली असल्याची माहिती माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
दिनांक 30 व 31 ऑक्टोबर 2025 रोजी अमळनेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी तत्काळ संबंधित प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनानेही वेळीच कार्यवाही करत पंचनामे पूर्ण केले.
त्यानंतर आमदार पाटील यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे नुकसानभरपाईची 19 कोटी 80 लाख रुपयांची रक्कम मंजूर होऊन ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. यासोबतच अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णतः उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने रब्बी पिकांसाठी बियाणे खरेदीसाठी हेक्टरी 10 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ॲग्रीस्टॉक क्रमांकामुळे थेट खात्यात रक्कम
या नुकसानभरपाईसाठी ई-केवायसी बंधनकारक नसून ॲग्रीस्टॉक क्रमांकाच्या आधारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवायसीसाठी वारंवार सुविधा केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही.
शेतकरी बांधवांनी आपला ॲग्रीस्टॉक क्रमांक नोंदणी करून संबंधित तलाठी / ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून मदतीची रक्कम लवकरात लवकर खात्यावर जमा होईल.
याबाबत बोलताना आमदार अनिल पाटील यांनी सांगितले की, शासनाने वेळोवेळी ॲग्रीस्टॉक क्रमांक काढण्याबाबत केलेल्या आग्रहाचा आज शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. अमळनेर तहसीलदारांनी यासाठी योग्य नियोजन केल्यामुळेच विना केवायसी थेट मदत शक्य झाली, असे सांगत त्यांनी तहसीलदारांचे अभिनंदन केले.
तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दुहेरी लाभ दिल्याबद्दल त्यांनी राज्य शासनातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री यांचे शेतकरी बांधवांच्या वतीने आभार मानले.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें