
अमळनेर : अटकाव न्यूज –समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या DL Social Foundation या सामाजिक संस्थेचा अधिकृत शुभारंभ शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता इंदिरा भवन, स्वामी नारायण मंदिरामागे, स्टेशन रोड, अमळनेर येथे होणार आहे. संस्थेच्या उद्घाटनानिमित्त ‘ज्ञानदीप अभियान’ या महत्त्वाकांक्षी सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार असून, अमळनेर तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू १,००० विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
“शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत” या संकल्पनेवर आधारित या अभियानाचा उद्देश कोणताही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये हा आहे. गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि समाजात शिक्षणाची चळवळ अधिक सक्षम करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
DL Social Foundation ही संस्था समाजहित, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, महिला व युवक सक्षमीकरण तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सातत्याने कार्य करणार आहे. भविष्यातही समाजोपयोगी आणि लोकाभिमुख उपक्रम राबवून गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
संस्थेचे संचालक डॉ. समाधान मैराळे आणि संचालिका सौ. भावना मैराळे यांनी अमळनेर तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून संस्थेच्या सामाजिक कार्याला बळ द्यावे, असे आवाहन केले आहे.
तसेच अमळनेर तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू, होतकरू व गुणवंत विद्यार्थी अथवा त्यांच्या पालकांनी शैक्षणिक मदतीसाठी DL Social Foundation शी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. पात्र विद्यार्थ्यांना संस्थेच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ देण्यासाठी फाउंडेशन सदैव तत्पर राहील, असा विश्वासही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.








