अमळनेरात अवैध कत्तलीवर पोलिसांचा छापा; मोठ्या प्रमाणात मांससाठा जप्त

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

५७० किलो मांस, ५० किलो कातडीसह कत्तलीची हत्यारे हस्तगत; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर : शहरातील पारधीवाडा परिसरातील कत्तलखान्यात सुरू असलेल्या जनावरांच्या कत्तलीवर अमळनेर पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट मोहिमेंतर्गत छापा टाकून कारवाई केली. १६ नोव्हेंबर रोजी पहाटे करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ५७० किलो विविध जनावरांचे मांस, सुमारे ५० किलो कातडी तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारी कुऱ्हाडी, सुऱ्या आणि कोयते असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी सात जणांविरुद्ध महाराष्ट्र पशुसंरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना पारधीवाडा परिसरातील कत्तलखान्यात जनावरांची कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी १६ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता पोलीस पथकाला छापा टाकण्याच्या सूचना दिल्या.
पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे, विनोद भोई, विनोद सोनवणे, नितीन मनोरे, विनोद संदानशिव आणि मंगल भोई यांच्या पथकाने पारधीवाडा येथील मुस्लिम कब्रस्थान परिसरातील कत्तलखान्यावर धाड टाकली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच इकबाल कुरेशी आणि बाबा कुरेशी हे दोघे पळून गेले. तर पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांना ताब्यात घेत परिसराला घेराव घातला.
या कारवाईदरम्यान पोलिसांना १८ हजार रुपये किमतीचे ३०० किलो गोवंशीय मांस, सहा हजार रुपये किमतीचे १०० किलो म्हशीचे मांस, तसेच अन्य १७० किलो मांस आढळून आले. याशिवाय सुमारे ५० किलो कातडी, हाडे, शिंगे आणि २८ कुऱ्हाडी, सुऱ्या व कोयते असा मुद्देमाल मिळून आला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
या प्रकरणात शेख रमजान शेख मुख्तार, अब्दुल अजीज अब्दुल शकुर, अल्ताफ खा अजीज खा पठाण, सलमान रजा सलीम अहमदखान, शेख मुख्तार शेख बिस्मिल्ला (सर्व रा. फरशी रोड, अमळनेर), इकबाल कुरेशी आणि बाबा कुरेशी (रा. अमळनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी जप्त केलेले मांस, हाडे, कातडी व शिंगे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने खड्डा करून पुरून नष्ट केले. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ५(अ), ५(ब), ५(क), ९, ९(अ), प्राणी छळ प्रतिबंधक कायदा १९६० चे कलम ११ तसेच भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.
दरम्यान, पाच आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश वाजे यांनी त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें