अमळनेरात महात्मा बळीराजांचा जयघोष; सवाद्य भव्य मिरवणुकीने बलिप्रतिपदा उत्साहात साजरी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बळीराजा स्मारकावर आजी-माजी आमदारांसह मान्यवरांकडून विधिवत पूजन व अभिवादन; ‘इडा, पीडा टळो, बळीचे राज्य येवो’चा जयघोष
अमळनेर (प्रतिनिधी) : बलिप्रतिपदेच्या पावन पर्वानिमित्त अमळनेर शहरात सालाबादाप्रमाणे यंदाही महात्मा बळीराजा यांच्या प्रतिमेची सवाद्य भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, शेतकरी गीतांचा गजर आणि बळीराजाच्या जयघोषाने शहरातील वातावरण भारावून गेले होते. मिरवणुकीच्या समारोपप्रसंगी बळीराजा स्मारकावर आजी-माजी आमदारांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी विधिवत पूजन करून महात्मा बळीराजांना अभिवादन केले.
मिरवणुकीचा प्रारंभ पटवारी कॉलनी येथून करण्यात आला. मांडळ येथील ज्येष्ठ शेतकरी पंढरीनाथ पाटील व ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर निकम यांच्या हस्ते बैलगाडी व नांगराचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, माजी नगरसेवक श्याम पाटील, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, माजी सभापती डॉ. दीपक पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, कैलास पाटील, अरुण देशमुख, अशोक बिऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकातून प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी महात्मा बळीराजांचे ऐतिहासिक महत्त्व, त्यांचे लोककल्याणकारी विचार व शेतकरी हिताचे योगदान याविषयी माहिती दिली. अर्बन बँकेच्या संचालिका सौ. वसुंधरा लांडगे यांनी जिजाऊ वंदना सादर केली. त्यानंतर शेतकरी गीतांच्या तालावर वाजणाऱ्या बँडच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ झाला.
पटवारी कॉलनी, मराठा कॉलनी, शिरूड नाका, स्वामी समर्थ मंदिर, विजय मारुती, धुळे रोड मार्गे महाराणा प्रताप चौकातून ही मिरवणूक फुलांनी सजविण्यात आलेल्या महात्मा बळीराजा स्मारकापर्यंत पोहोचली. मिरवणुकीत सजविलेल्या वाहनावर महात्मा बळीराजांची भव्य प्रतिमा विराजमान करण्यात आली होती. तसेच भव्य नांगरासह बाल शिवराय व राजमाता जिजाऊ उभे असलेली आकर्षक बैलगाडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
मिरवणुकीच्या समारोपप्रसंगी माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते बळीराजा स्मारकावर विधिवत पूजन करण्यात आले. माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी उपस्थितांना बलिप्रतिपदेच्या शुभेच्छा देताना, ‘इडा, पीडा टळून बळीचे राज्य यावे, यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होणे आवश्यक आहे,’ असे आवाहन केले.
यावेळी बळीराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी बळीराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ठिकठिकाणी नागरिकांनी प्रतिमेचे दर्शन घेत पुष्पवृष्टी केली. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ या घोषणांनी उत्सवात विशेष चैतन्य निर्माण झाले. महात्मा बळीराजांचे लोककल्याणकारी विचार, समतेची शिकवण आणि शेतकऱ्यांसाठीचे योगदान यांचे स्मरण यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले, तर आभार उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी मानले.
याप्रसंगी युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, शेतकी संघाचे संचालक संजय पाटील, विक्रांत पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, डी. एम. पाटील, महेश पाटील, वाल्मीक पाटील, एल. टी. पाटील, सयाजीराव पाटील, विवेक पाटील, मराठा समाज मंडळाचे शेखर पाटील, दत्तू शामराव पाटील, नगरसेवक सचिन पाटील, संजय पाटील, पवार आप्पा, योगेश शिंदे, भरत बोरसे, बाळू संतोष पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी, नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अत्यंत उत्साही, भक्तिमय व मंगलमय वातावरणात महात्मा बळीराजांची मिरवणूक संपन्न झाली. या माध्यमातून बळीराजांच्या स्मृतींना उजाळा देत शेतकरी एकता, समता आणि लोककल्याणाचा संदेश देण्यात आला.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें