
आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन; सौ. जयश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती
अमळनेर:-मोंढाळे–फाफोरे–अमळनेर–धार–मारवड–निम–कपिलेश्वर या प्रजिमा ४९ मार्गावरील किमी ३३/३०० ते ४०/०० (अमळनेर ते धार भाग) या रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर रोजी मौजे धार येथे संपन्न झाले.विकासाची वाट आता अधिक मजबूत होणार, प्रगतीचा प्रवास अधिक वेगवान होणार आणि ग्रामीण भागाच्या समृद्धीला नवी दिशा मिळणार, असा विश्वास या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.
तब्बल १ कोटी ८८ लाख रुपये अंदाजित खर्चाच्या या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी जि प सदस्या सौ. जयश्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.ग्रामीण भागाच्या विकासाला गती देणारा आणि गावागावांतील दळणवळण अधिक सुलभ करणारा हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. रस्त्याची सुधारणा झाल्यानंतर शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे. शेतीमालाची वाहतूक, शैक्षणिक व आरोग्यविषयक सुविधा तसेच ग्रामीण भागातील आर्थिक आणि सामाजिक विकासालाही या रस्त्यामुळे निश्चितच चालना मिळणार आहे.
ग्रामीण भागातील रस्ते हे केवळ एका गावाला दुसऱ्या गावाशी जोडणारे मार्ग नसून ते विकासाच्या संधींना जोडणारे महत्त्वाचे दुवे आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामामुळे धार परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मा. सरपंच गणेश धोंडू पाटील, यशवंत शंकर पाटील, अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अलीम मुजावर, यशवंत धोंडू पाटील, किरण हिम्मतराव पाटील (मालपूर), किरण भाईदास पाटील (मालपूर), संजय टेलर, बाबू पेंटर, उमाकांत भाऊसाहेब, डॉ. विलास पाटील, भानुदास पाटील, रज्जाक शाह, माजी सरपंच वसंत काटे, सतीश उत्तम पाटील, बाळू ड्रायव्हर, शौकत सय्यद, सत्तार मुजावर, खाटीक सर यांच्यासह परिसरातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासाचा संकल्प, प्रगतीचा ध्यास!ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सक्षम झाल्याशिवाय सर्वांगीण विकासाला गती मिळू शकत नाही. या दृष्टिकोनातून अमळनेर ते धार रस्त्याच्या सुधारणेसाठी मंजूर झालेला १ कोटी ८८ लाखांचा निधी हा परिसराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कामामुळे अनेक वर्षांपासूनच्या दळणवळणविषयक अडचणी दूर होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.








