राजभवनात ‘नवभारत उल्लास साक्षरता वारी २०२६’ उपक्रमाचे सादरीकरण; राज्यपालांकडून कौतुक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई, दि. ४ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘नवभारत उल्लास साक्षरता वारी २०२६’ या राज्यस्तरीय जनजागृती उपक्रमाची माहिती मुंबई येथील लोकभवन (राजभवन), मलबार हिल येथे महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांना सादर करण्यात आली.
शिक्षण संचालक (योजना) श्री. कृष्णकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली, शिक्षण उपसंचालक श्रीमती वंदना वाहुळ, सहायक संचालक श्री. सतीश चौधरी तसेच उपशिक्षण अधिकारी (योजना) श्री. सचिन अनंतकवळस यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे विभागीय नोडल अधिकारी डॉ. मनिलाल शिंपी यांनी ‘नवभारत उल्लास साक्षरता वारी २०२६’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती उपक्रमांची सविस्तर माहिती देत, साक्षरतेचे सामाजिक महत्त्व आणि लोकसहभागाची आवश्यकता अधोरेखित केली. या अभिनव उपक्रमाचे राज्यपालांनी कौतुक करत सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमात आर.एस.पी. अधिकारी व कलाशिक्षक श्री. संदीप पाटील यांनीही साक्षरता अभियानासाठी सुरू असलेल्या कार्याचा आढावा घेत मनोगत व्यक्त केले. तसेच आर.एस.पी. अधिकारी श्री. यशवंत महाजन, श्री. आनंद मेहेर, स्वाती धुमाळ, ललिता सोनवणे, सुंदर कोळेकर आणि दिप्ती कांबळे यांनी उपस्थित नागरिकांना साक्षरता वारी प्रकल्पाची माहितीपत्रके वितरित केली. साक्षरतेवर आधारित प्रभावी घोषवाक्यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात आला.
‘नवभारत उल्लास साक्षरता वारी २०२६’ हा उपक्रम राज्यातील निरक्षर नागरिकांना साक्षरतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच शिक्षण, सामाजिक उत्तरदायित्व आणि जनजागृती यांचा प्रभावी संगम घडवून आणणारा उपक्रम ठरत असून, समाजातील सर्व घटकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें