
दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करा; अन्यथा पालिकेत येऊन जाब विचारण्याचा इशारा
अमळनेर : शहरातील गंभीर बनलेल्या पाणीप्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. गेल्या २२ दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असताना केवळ आश्वासने देऊन चालणार नाही, तर नागरिकांच्या घरापर्यंत प्रत्यक्ष पाणी पोहोचले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने अनेक नागरिकांनी आमदार अनिल पाटील यांच्याकडे धाव घेत तक्रारी मांडल्या.
या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी पालिकेचे मुख्याधिकारी तसेच पाणीपुरवठा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. “नागरिकांना आश्वासन नको, तर प्रत्यक्ष पाणी हवे आहे. दोन दिवसांत संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा,” अशी स्पष्ट तंबी त्यांनी दिली.
तसेच दोन दिवसांत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर मी स्वतः पालिकेत येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणार, असा इशाराही आमदार पाटील यांनी दिला आहे.
आमदारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर पालिका प्रशासनही कामाला लागले असून, पाणीपुरवठ्यातील अडचणी दूर करून नागरिकांना नियमित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याचे समजते.
दरम्यान, आता दिलेल्या दोन दिवसांच्या अल्टिमेटमनंतर पालिका प्रशासन प्रत्यक्षात किती प्रभावी कार्यवाही करते आणि शहरातील पाणीप्रश्न कितपत सुटतो, याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे.







