सेवा संकल्प अभियानांतर्गत अमळनेरमध्ये महावितरणची बैठक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवा : आमदार अनिल पाटील

अमळनेर : सेवा संकल्प अभियानाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने अमळनेर येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता (धरणगाव विभाग) सोनगिरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता (अमळनेर शहर) ज्ञानेश्वर अंबाडकर, उपकार्यकारी अभियंता देवेंद्र वाणी (धरणगाव विभाग), उपकार्यकारी अभियंता (अमळनेर ग्रामीण) भावसार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार अनिल पाटील यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजना (स्मार्ट) तसेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजना यांची सविस्तर माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तहसील कार्यालय, अमळनेर येथे १७ ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत असून, नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत ७८ हजारांपर्यंत अनुदान
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत ३ किलोवॅटपर्यंत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या ग्राहकांना अंदाजे ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती केल्यामुळे ग्राहकांच्या वीज खर्चात मोठी बचत होण्यास मदत होणार आहे.
कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी रूफटॉप सोलर योजना
मागील वर्षभरात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेल्या ग्राहकांसाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजना (स्मार्ट) राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत १ किलोवॅट क्षमतेचे सोलर इंस्टॉलेशन कमी खर्चात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ओपन व ओबीसी प्रवर्गातील ग्राहकांसाठी अंदाजे १० हजार रुपये, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी अंदाजे ५ हजार रुपये, तर बीपीएल ग्राहकांसाठी केवळ २,५०० रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाची प्रत्यक्ष किंमत अंदाजे ६० ते ७० हजार रुपये असून, उर्वरित रक्कम केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा लाभ
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वतंत्र आणि शाश्वत सौरऊर्जेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना केवळ १० टक्के, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५ टक्के रक्कम भरून सौर कृषी पंप संच मिळणार आहे. उर्वरित खर्च केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून केला जाणार आहे.
शेतजमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप उपलब्ध असून, पंपासाठी ५ वर्षांची दुरुस्ती हमी तसेच विमा संरक्षण देण्यात येणार आहे. सौर पंपामुळे शेतकऱ्यांना वीजबिल आणि लोडशेडिंगच्या समस्येतून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
अमळनेर तालुक्यातील इच्छुक नागरिक व शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयातील महावितरणच्या सेवा सेतू स्टॉलला भेट द्यावी किंवा जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें