पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटित व्हा; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघात सहभागी व्हा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

खान्देश विभागाचे नूतन अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे यांचे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकारांना आवाहन

अमळनेर : पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, सुरक्षितता आणि व्यावसायिक विकासासाठी पत्रकारांनी एकत्र येणे गरजेचे आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कार्यरत पत्रकारांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई या संघटनेत सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे नवनियुक्त खान्देश विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे यांनी केले आहे.
पत्रकारांच्या विविध समस्या आणि प्रश्नांना संघटित व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या न्याय्य मागण्यांचा शासनस्तरावर प्रभावीपणे पाठपुरावा व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. संघटनेचे संस्थापक तथा राज्य संघटक संजयजी भोकरे आणि प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासरावजी आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर पत्रकार संवाद यात्रेच्या माध्यमातून पत्रकारांशी थेट संवाद साधण्यात आला. या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न जाणून घेत संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देण्यात आले.
डॉ. समाधान मैराळे यांनी यापूर्वी तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना पत्रकारांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविले. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा विचार करून सदस्य पत्रकारांसाठी १० लाख रुपयांचे अपघात संरक्षण विमा कवच उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्याचबरोबर पत्रकारांसाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि कौशल्यविकास शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
खान्देशातील पत्रकारांसाठी विमा संरक्षण आणि मदत केंद्र
खान्देश विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पत्रकारांच्या सुरक्षिततेला विशेष प्राधान्य देण्यात येणार असल्याचे डॉ. मैराळे यांनी सांगितले. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील संघटनेच्या सदस्य पत्रकारांसाठी अपघात संरक्षण विमा योजना राबविण्यात येणार आहे.
तसेच पत्रकारांना अडचणीच्या काळात तातडीने मदत मिळावी यासाठी ‘पत्रकार मदत केंद्र / हेल्पलाईन’ सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून गरजेनुसार कायदेशीर मार्गदर्शन, वैद्यकीय मदतीसाठी समन्वय तसेच विविध अडचणींच्या प्रसंगी आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पत्रकार भवन आणि पाल्यांसाठी शैक्षणिक मदत
खान्देशातील प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, सदस्य पत्रकारांच्या पाल्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे. पत्रकारांच्या कुटुंबातील सुख-दुःखाच्या प्रसंगी संघटनेच्या माध्यमातून ‘फुल नाही तर फुलाची पाकळी’ या भावनेतून शक्य ते आर्थिक सहकार्य करण्याची भूमिका घेण्यात येणार आहे.
बदलत्या पत्रकारितेनुसार प्रशिक्षणावर भर
डिजिटल युगातील पत्रकारितेतील बदल लक्षात घेऊन पत्रकारांच्या व्यावसायिक विकासासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. डिजिटल पत्रकारिता, मोबाईल पत्रकारिता, सोशल मीडिया, AI तंत्रज्ञान, फॅक्ट चेकिंग, पत्रकारितेशी संबंधित कायदे आणि पत्रकार सुरक्षा या विषयांवर नियमित कार्यशाळा व मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येणार आहेत.
नवोदित पत्रकारांना अनुभवी पत्रकारांचे मार्गदर्शन मिळावे, यासाठीही विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
ग्रामीण-शहरी पत्रकारांना एकाच व्यासपीठावर आणणार
ग्रामीण आणि शहरी पत्रकार असा कोणताही भेद न करता जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक कार्यरत पत्रकाराला संघटनेच्या माध्यमातून जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पत्रकारांच्या अडचणी, प्रश्न आणि मागण्यांसाठी एकजुटीने आवाज उठविण्यासाठी मजबूत संघटनात्मक व्यासपीठ उभे करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
“पदासाठी नव्हे, तर पत्रकारांच्या हितासाठी संघटित व्हा”
“पत्रकारांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आणि त्यांच्या व्यावसायिक विकासासाठी नवीन संधी निर्माण करणे, ही संघटनेची प्रमुख भूमिका राहील. विमा संरक्षण आणि पत्रकार मदत केंद्राच्या माध्यमातून पत्रकारांसाठी प्रत्यक्ष कामाचा नवा टप्पा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे पत्रकारांनी केवळ पदासाठी नव्हे, तर पत्रकारांच्या हितासाठी एकत्र येऊन संघटनेत सहभागी व्हावे,” असे आवाहन डॉ. समाधान मैराळे यांनी केले.
जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कार्यरत पत्रकारांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या या संघटनात्मक प्रवाहात सहभागी होऊन पत्रकारांच्या हक्क आणि हितासाठी एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें