
अमळनेर : शहरातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शंकर नगर, गुरुकृपा कॉलनी व संताजी नगर परिसरातील सुमारे २५० नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किराणा किटचे वाटप करण्यात आले.
अमळनेर शहरात ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बोरी नदी व पिंपळे नाला परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात घरगुती साहित्याचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद हद्दीतील १८०० पूरग्रस्तांना माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते यापूर्वी किराणा किटचे वाटप करण्यात आले होते.
मात्र, काही बाधित कुटुंबे या मदतीपासून वंचित राहिल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे व नगरसेवक सचिन पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आमदारांनी प्रशासनाला अतिरिक्त किराणा किट उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार २० ऑगस्ट रोजी संबंधित भागातील सुमारे २५० लाभार्थ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
शंकर नगर येथील श्रीरंग कॉलनी परिसरात माजी नगराध्यक्षा सौ. जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते १४६ लाभार्थ्यांना किराणा किट देण्यात आले. यावेळी नगरसेवक सचिन पाटील व नगरसेविका सौ. योगिता कापडणेकर उपस्थित होते.
तसेच गुरुकृपा कॉलनी व संताजी नगर परिसरात प्रशासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून १०० लाभार्थ्यांना किराणा किटचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, वेद राजेश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळावी यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या मदतीबद्दल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.







