
अमळनेर : पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार येथील डी. आर. कन्या शाळेत चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास विद्यार्थिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चित्रकला स्पर्धेसाठी पं. दीनदयाल उपाध्याय यांचे व्यक्तिचित्रण, ‘एकात्म मानव सिद्धांत’ व ग्रामीण विकास हे विषय देण्यात आले होते. स्पर्धेत एकूण ४० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. यामधून उत्कृष्ट ठरलेल्या तीन विद्यार्थिनींची चित्रे जिल्हास्तर स्पर्धेसाठी पाठविण्यात आली आहेत.
निबंध स्पर्धेत २१ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनकार्य व विचारांवर आधारित निबंधांमधून विद्यार्थिनींनी अभ्यासपूर्ण व विचारप्रवर्तक मांडणी केली. यातील तीन निबंधांची जिल्हास्तरासाठी निवड करण्यात आली.
उच्च प्राथमिक गटातील चित्रकला स्पर्धा डी. एन. पालवे यांनी घेतली, तर निबंध स्पर्धेचे नियोजन व मार्गदर्शन सौ. पी. एस. सराफ यांनी केले. स्पर्धांसाठी उपमुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागातून पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचा परिचय घडवून देण्याचा उद्देश सफल झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.








