
अमळनेर :- अटकाव न्यूज |शहरात उभारण्यात येत असलेल्या नवीन तहसील कार्यालयाच्या बाह्य परिसरात माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमळनेर शहर शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, कार्याध्यक्ष विनोद कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार अनिल पाटील यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्व. अजितदादा पवार यांनी विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. महसूल इमारत, प्रशासकीय इमारत, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती इमारत, एस.टी. कार्यशाळा तसेच तालुक्यातील महत्त्वाकांक्षी निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण यांसाठी त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासात त्यांच्या कार्याचा मोठा वाटा असून, त्या ऋणातून उतराई होण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीच्या बाह्य परिसरात त्यांचे स्मारक अथवा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासाठी खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते यांनी सामूहिकरित्या प्रयत्न करून आवश्यक कागदपत्रे व प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठपुरावा करावा, असेही निवेदनात नमूद आहे.
या निवेदनावर शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, कार्याध्यक्ष विनोद कदम यांच्यासह इम्रान खाटीक, आलिम मुजावर, सचिन पाटील, राहुल गोत्राळ, कैलास पाटील, गोविंदा बाविस्कर, निलेश देशमुख, अर्षद खाटीक, भूषण पाटील, अनिल शिसोदे, सुलतान खाटीक, मधुकर पाटील, महेंद्र पाटील, अलीम मुजावर, किशोर देसले, जाकीर खाटीक, निखिल पाटील, पंकज जैन, जे. व्ही. बाविस्कर, एन. जे. पाटील, एस. जी. बत्तीसे, एस. आर. शिंगाणे, चेतन बोरसे, भैय्या वाघ, बाबा खाटीक, गौरव पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.








