
शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना; मदतकार्यात नागरिक, प्रशासन व सर्वधर्मीयांचा सहभाग
अमळनेर : प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानात मंगळवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले. सुदैवाने मंदिरातील देवमूर्ती सुरक्षित राहिल्या. या दुर्घटनेनंतर प्रशासन, अग्निशमन दल, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी तत्परतेने मदतकार्य राबवले.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी हभप प्रसाद महाराज संत सखाराम महाराजांची दिंडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले होते. रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास सीसीटीव्ही यंत्रणेजवळ शॉर्टसर्किट होऊन विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वरच्या मजल्यावरील बैठकीच्या खोलीत आग लागली. मंदिरातील लाकडी बांधकाम आणि रंगकामामुळे आगीने अल्पावधीतच मोठे रूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर व पारोळा येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर खाजगी टँकर, पाणी वाहतूक करणारी वाहने आणि नागरिकांच्या सहकार्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले.
या वेळी बोरी नदीच्या दोन्ही काठांवरील रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचणे शक्य झाले. या सुविधेमुळे मदतकार्यात मोठी मदत झाल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
दिंडीचा प्रवास सुरूच
दुर्घटनेची माहिती मिळूनही हभप प्रसाद महाराज यांनी पंढरपूर दिंडीचा प्रवास थांबवला नाही. विठ्ठलभक्तीला प्राधान्य देत त्यांनी दिंडी नियोजित मार्गाने पुढे सुरू ठेवली. त्यांच्या या भूमिकेची भाविकांमध्ये चर्चा होती.
प्रशासनाची तत्परता
घटनेची माहिती मिळताच अमळनेर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, पारोळा पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी अग्निशमन दल घटनास्थळी रवाना केले व स्वतःही तेथे उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला.
आमदार अनिल पाटील यांनी चोपडा, शिरपूर व पारोळा येथून अतिरिक्त अग्निशमन गाड्या मागविण्याची विनंती केली. तसेच खाजगी टँकर उपलब्ध करून देण्याचे प्रयत्नही करण्यात आले. अमळनेर शहर पत्रकार संघानेही सामाजिक माध्यमांद्वारे खाजगी टँकरधारकांना मदतीचे आवाहन केले.
सर्वधर्मीयांनी दिला मदतीचा हात
आग विझविण्याच्या कामात विविध समाजातील नागरिकांनी खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला. या प्रसंगी परस्पर सहकार्य, सामाजिक एकोपा आणि शांततेचे दर्शन घडले. विविध स्वयंसेवक, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी कोणताही भेदभाव न करता मदतकार्य केले.
वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी
प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. वाढती गर्दी नियोजनबद्ध पद्धतीने हटविल्याने अग्निशमन दलाला काम करणे सुलभ झाले.
देवमूर्ती सुरक्षित
आगीत मंदिर परिसराचे मोठे नुकसान झाले असले, तरी मंदिरातील देवमूर्ती सुरक्षित राहिल्या. ही बाब भाविकांसाठी दिलासादायक ठरली असून अनेकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले.
काही दिवस दर्शन बंद
आगीत झालेल्या नुकसानीनंतर मंदिराच्या इमारतीची संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) पूर्ण होईपर्यंत भाविकांसाठी मंदिर काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी दिली.









