
अमळनेर :येथील प्रताप हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विद्यार्थी संघ निवडणूक लोकशाही पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणे, नेतृत्वगुणांना वाव देणे तसेच जबाबदारीची भावना विकसित करणे या उद्देशाने या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले.
निवडणूक प्रक्रियेच्या प्रारंभी इच्छुक विद्यार्थ्यांकडून नामांकन अर्ज स्वीकारण्यात आले. अर्जांची छाननी करून प्रत्येक वर्गातून तीन उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी वेळ देण्यात आला. प्रचारानंतर लोकशाही पद्धतीने गुप्त मतदान घेण्यात आले. प्रत्येक वर्गाचे वर्गशिक्षक बूथ प्रमुख म्हणून कार्यरत होते. मतदानावेळी शाई लावण्याची जबाबदारी नम्रता दोरकर यांनी पार पाडली, तर निवडणूक अधिकारी म्हणून जयश्री पाटील व सचिन अहिरे यांनी कामकाज पाहिले.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे सूत्रसंचालन डी. एन. पालवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निखिल पाटील, सुहास खांजोडकर, कृष्णा कोळी, सागर पवार व प्रसाद गोसावी यांनी मोलाचे सहकार्य केले.
मतदानानंतर पारदर्शक पद्धतीने मतमोजणी करून सर्व वर्गांचे प्रतिनिधी जाहीर करण्यात आले. निवडून आलेल्या प्रतिनिधींचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले तसेच आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्त्व, मतदानाचा अधिकार आणि नेतृत्वाची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शिस्तबद्ध, पारदर्शक आणि यशस्वीरीत्या पार पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांविषयी सकारात्मक भावना अधिक दृढ झाल्या.
निवडून आलेले वर्ग प्रतिनिधी :
अफान शेख, जिशान शेख शरीफ, यश लोंढे, इम्तियाज शेख, साई लोंढे, निखिल पाटील, शिफा शेख, नावेद शरीफ शेख, साई पाटील, ओम लोंढे आणि किरण मोरे.








