
अमळनेर ( अटकाव न्यूज ):-
तालुक्यातील मांडळ गावच्या सुपुत्राने देशसेवेत मोठी कामगिरी बजावून आपल्या गावाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. श्री. कैलास पंडितराव शिरसाट यांची केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) इन्स्पेक्टर पदावर नियुक्ती झाली असून त्यांना तिसरा स्टार बहाल करण्यात आला.
श्री. शिरसाट यांनी वयाच्या केवळ १९व्या वर्षी सीआरपीएफमध्ये भरती होऊन देशसेवा सुरू केली. सलग ३८ वर्षे अखंड सेवा बजावताना त्यांनी गुजरात, राजस्थान, काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम, त्रिपुरा, मिझोरम, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र अशा विविध राज्यांत कर्तव्य बजावले. विशेषतः काश्मीरमधील बारा वर्षांच्या सेवेत त्यांनी डोळा, बडरवाढ, किस्सरवार, बारामुल्ला, कुपवाडा, लाल चौक, जम्मू येथील भगवतीनगर अशा अत्यंत संवेदनशील भागात कार्य करत देशाच्या सुरक्षेत मोलाचा वाटा उचलला.
त्यांचा सेवा प्रवास हवालदार पदापासून सुरू झाला. १६ वर्षे हवालदार (एक स्टार), त्यानंतर ४ वर्षे सब इन्स्पेक्टर (दोन स्टार) अशी बढती घेत, आता इन्स्पेक्टर पदावर (तीन स्टार) त्यांची नियुक्ती झाली. सी.ओ. अरविंद सिंग यांच्या हस्ते तिसरा स्टार बहाल करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी त्यांचे सहकारी व मित्र उपस्थित होते.
शिरसाट कुटुंबाची पार्श्वभूमी देखील तितकीच प्रेरणादायी आहे. त्यांचे वडील स्व. पंडितराव शिरसाट यांना तीन मुलगे व एक मुलगी असून, मोठे दोन भाऊ यशस्वी कारकिर्दीनंतर निवृत्त झालेले आहेत. धाकटे बंधू सामाजिक कार्यात सक्रिय राहून आदिवासी कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य करीत आहेत. कैलास शिरसाट यांची धर्मपत्नी आणि दोन उच्चशिक्षित मुलं देखील चांगल्या नोकऱ्यांमध्ये कार्यरत आहेत.
आजचा आनंदाचा क्षण त्यांच्या कुटुंबीयांनी व्हिडिओ कॉलद्वारे प्रत्यक्ष पाहिला. विशेष म्हणजे त्यांच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. मांडळ गावकऱ्यांसाठी ही अभिमानाची वेळ ठरली.
या गौरवक्षणानंतर डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील (सभापती, पंचायत समिती अमळनेर), ग्रामस्थांसह शिवाजी चौक बाजारपेठेत जमले. फटाके फोडून व “भारत माता की जय” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. देशसेवेतील या अभिमानाच्या क्षणाने गावात देशप्रेम व कृतज्ञतेची भावना उचंबळून आली.
मांडळ गावातील तरुणांसाठी कैलास शिरसाट हे खरेच एक आदर्श आणि प्रेरणास्थान ठरले आहेत. प्रामाणिकपणे व कष्टपूर्वक केलेल्या कार्याला यश नक्कीच मिळते, हे त्यांनी आपल्या सेवेमुळे सिद्ध करून दाखवले आहे. 🇮🇳
