
अमळनेर : [ अटकाव न्यूज ] बदलत्या वातावरणामुळे डासांची उत्पत्ती वाढत असून त्यातून डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. हा धोका टाळण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने अमळनेर नगरपरिषद मार्फत प्रभाग क्रमांक १६ मध्ये BSC पावडर फवारणी मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
या आरोग्यविषयक उपक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर मोहिम मा. आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत संपूर्ण परिसरात नियोजनबद्ध पद्धतीने फवारणी करण्यात येत आहे.
या प्रसंगी नगरसेविका निलिमा पाटील, नगरसेवक महेश देशमुख, आरोग्य सभापती प्रा. रामकृष्ण पाटील यांच्यासह रवि पाटील, कपिल पाटील, संजय पाटील, रोहित तेले, महेश पाटील, प्रविण महाजन, विजय वाणी, किशोर सैंदाणे, विजय चौधरी, भास्कर भावसार, मुकादम समाधान केदार तसेच अन्य नगरपरिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमासाठी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, संतोष जाधव, संतोष माणिक यांनी मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी प्रभावीपणे केली.
नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केले की, घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नये, स्वच्छता राखावी व नगरपरिषदेच्या आरोग्यविषयक मोहिमांना सहकार्य करावे. अशा प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे डासजन्य आजारांवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.








