अमळनेर बाजार समितीची राज्यात प्रथम बाजी; स्व. अजितदादा पवार यांचे शेतकरी प्रेरणा स्मारक साकारतेय

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर (जि. जळगाव) :अटकाव न्यूज-
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचा महाराष्ट्रातील पहिलाच पुतळा अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी प्रेरणा स्मारक या स्वरूपात उभारला जात असून, त्याचे लोकार्पण येत्या मार्च महिन्यात भव्य शेतकरी सभेत करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी दिली.
या स्मारकात समाविष्ट असलेली बैलगाडी व शेतकरी यांचे पुतळे नुकतेच बाजार समितीच्या आवारात दाखल झाले असून, त्यांचे विधिवत पूजन करण्यात आले आहे. लवकरच स्मारकाचे काम पूर्णत्वास येणार असून, लोकार्पणासोबतच विविध विकासकामांचे भूमिपूजन व शेतकरी सन्मान सोहळाही संपन्न होणार आहे.
स्व. अजितदादा पवार यांनी अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले होते. माजी मंत्री व आमदार अनिल पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील तसेच माजी नगराध्यक्ष स्व. सुरेश ललवाणी यांच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी अमळनेरच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे येथील शेतकरी व सर्वसामान्य जनतेशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले होते.
या योगदानाच्या स्मरणार्थ, अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात येणाऱ्या चौथऱ्यावर बैलगाडीवर उभ्या शेतकरी रूपातील स्व. अजितदादा पवार यांचा पुतळा साकारण्यात येणार आहे. या स्मारकात धान्य कापणारा शेतकरी तसेच धान्याचे पोते उचलणारा शेतकरी असे स्वतंत्र पुतळेही असतील. संपूर्ण स्मारकाची उंची सुमारे १५ फूट असून, अजितदादांचा पुतळा त्यांच्या प्रत्यक्ष उंचीइतकाच असणार आहे.
सदर पुतळे समिती आवारात बसवण्याच्या कामाचा शुभारंभ करताना सभापती अशोक आधार पाटील, संचालक डॉ. अनिल शिंदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी संचालक प्रकाश अमृतकार, सचिव डॉ. उमेश राठोड, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, व्यापारी योगेश महाजन, पुणे येथील मूर्तिकार शिंदे यांच्यासह परिसरातील शेतकरी, हमाल, मापाडी व कर्मचारी उपस्थित होते.
या निमित्ताने बाजार समितीला पणन विभागाकडून मिळालेल्या सुमारे सहा लाख रुपयांच्या बोनसातून शेतकऱ्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात येणार आहे. शिस्तबद्ध व पारदर्शक कारभारामुळे बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर आवक होत असून, अमळनेर बाजार समिती जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. पणन कर्जाची नियमित परतफेड, सुपर्व्हिजन फी व अंशदानाची नियमितता यामुळेच हा बोनस मिळाल्याचे सभापती अशोक पाटील यांनी सांगितले.
याच शेतकरी सभेत विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. बाजार समितीच्या आवारात १३६ दुकान गाळ्यांचे बांधकाम, लेखापाल कार्यालय, पातोंडा उपबाजारातील वे-ब्रिज, बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन तसेच मारवड उपबाजार समितीतील संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. या सर्व विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
तसेच प्रस्तावित शेतकरी भवन, हमाल-मापाडी भवन व व्यापाऱ्यांसाठी सुसज्ज २०० फूट शेड या नव्या कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. आगामी उन्हाळ्यात लिलावासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोफत थंड पेय तर हिवाळा व पावसाळ्यात मोफत चहा देण्याची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे.
आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, खासदार स्मिता वाघ, उपसभापती सुरेश पाटील, संचालक मंडळ, व्यापारी, सचिव, कर्मचारी, हमाल, मापाडी व गुमास्ता यांच्या सहकार्याने अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी हिताचे विविध उपक्रम राबवत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
असे असेल अजितदादांचे शेतकरी प्रेरणा स्मारक
संपूर्ण महाराष्ट्रात अजितदादांना मानणारा मोठा वर्ग आहे. सर्वत्र त्यांच्या स्मारकाची मागणी होत असतानाच अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यात प्रथम बाजी मारली आहे. हे स्मारक शेतकऱ्यांना तसेच अमळनेर तालुक्यातील जनतेला प्रेरणा, धाडस व नवी ऊर्जा देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें