स्वर्गवासी डॉ. अपर्णा मुठ्ठे : समाजसेवेची प्रेरणादायी गौरवगाथा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर- अटकाव न्यूज: हितेंद्र बडगुजर-शहरातील सामाजिक, सांस्कृतिक व वैद्यकीय क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व स्वर्गवासी डॉ. अपर्णा ताई मुठ्ठे यांचे दि. २ मार्च २०२६ रोजी दुःखद निधन झाले. ८ मार्च हा जागतिक महिला दिन साजरा होत असताना त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे हे संपूर्ण अमळनेरकरांसाठी अभिमानाचे आणि भावनिक क्षण आहेत. आपल्या कार्यातून त्यांनी अनेक महिलांना प्रेरणा दिली व समाजसेवेचा आदर्श निर्माण केला.
डॉ. अपर्णा मुठ्ठे या अमळनेरच्या प्रसिद्ध मुठ्ठे कुटुंबातील सून तर मुंबई हे त्यांचे माहेर होते. अत्यंत शिस्तप्रिय, हजरजबाबी आणि सतत हसतमुख असणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांना आपलेसे वाटायचे. कोणासाठी त्या ताई, कोणासाठी मोठी बहीण तर कोणासाठी आईसमान आधारवड होत्या. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करण्याची त्यांची विलक्षण क्षमता होती. महिलांच्या सहली, सामाजिक कार्यक्रम किंवा विविध उपक्रम असतील तर त्या स्वतः पुढाकार घेऊन सर्वांना एकत्र आणत व प्रत्येकाशी आत्मीयतेने संवाद साधत असत.
महिलांसाठी जिम व विद्यार्थिनींसाठी अभ्यासिका
अमळनेर शहरात महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. शहरात प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र लेडीज जिम आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका उभारण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. अमळनेर नगर परिषद व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने हा उपक्रम साकार झाला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे उभ्या राहिलेल्या या सुविधा आजही अनेक महिलांना व विद्यार्थिनींना उपयोगी ठरत आहेत.
अमळनेर महिला मंच ट्रस्टची स्थापना
महिलांमधील सुप्तगुणांना वाव देणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा डॉ. अपर्णा ताईंचा आयुष्यभराचा ध्यास होता. याच उद्देशाने त्यांनी सहकाऱ्यांच्या सहकार्याने अमळनेर महिला मंच ट्रस्टची स्थापना केली. गेल्या पाच वर्षांपासून त्या या संस्थेच्या अध्यक्षपदी कार्यरत होत्या.
महिला मंचच्या माध्यमातून त्यांनी महिलांसाठी विविध सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक उपक्रम राबवले. दरवर्षी जानेवारी महिन्यात शिवाजी नाट्यगृह परिसरात महिलांसाठी विविध प्रकारचे स्टॉल आयोजित केले जात. या स्टॉलमधून गृहिणींना आपल्या हातगुणांचे प्रदर्शन व विक्रीची संधी मिळत असे. पापड, लोणचे, मसाले, झुणका-भाकर, पुरणपोळी, चहा-नाश्ता अशा विविध खाद्यपदार्थांसह हस्तकला वस्तूंची विक्री करून महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग खुला होत असे.
त्याचप्रमाणे कलागुण असलेल्या युवतींना नृत्य, गायन, एकांकिका आदी सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात होते. निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यांसारख्या विविध उपक्रमांतून महिलांना प्रोत्साहन देत विजेत्यांचा सन्मान केला जात असे. महिलांना आत्मविश्वास देऊन समाजात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
सर्व धर्म परिषद – २०२४
समाजात शांतता आणि बंधुभाव टिकून राहावा यासाठी त्यांनी २०२४ साली अमळनेर शहरात सर्व धर्म परिषद आयोजित केली. या परिषदेत हिंदू, मुस्लिम, जैन, शीख, ख्रिश्चन, पारशी, सिंधी व बौद्ध समाजातील धर्मगुरूंना एकत्र आणण्यात आले. प्रत्येक धर्मगुरूंनी आपल्या धर्मातील मानवतेचा संदेश देत समाजात सलोखा टिकवण्याचे आवाहन केले. हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला व महाराष्ट्रात आदर्श ठरेल असा उपक्रम म्हणून त्याची दखल घेण्यात आली.
भिल्ल समाजातील मुलांसाठी शाळा
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी त्यांनी समाजातील वंचित घटकांसाठी महत्त्वाचा उपक्रम राबवला. अमळनेरमधील भिल्ल वस्तीत राहणाऱ्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने रोटरी क्लब अमळनेरच्या माध्यमातून रोटरी अॅन्स प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. प्रख्यात बिल्डर प्रकाश मुंदडे यांच्या सहकार्याने ही शाळा उभी राहिली. आजही त्या शाळेत अनेक मुलांना शिक्षण मिळत आहे.
वैद्यकीय सेवेतून समाजसेवा
डॉ. अपर्णा मुठ्ठे या सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ होत्या. त्यांचे पती स्वर्गीय डॉ. चंद्रशेखर मुठ्ठे यांच्या सोबत त्यांनी अनेक वर्षे वैद्यकीय सेवा केली. गरीब व गरजू रुग्णांना अत्यल्प दरात उपचार देऊन त्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला.
दर आठवड्याला संत सखाराम महाराजांच्या मठात तसेच बहुउद्देशीय आधार संस्थेच्या माध्यमातून विविध खेड्यांमध्ये जाऊन त्यांनी रुग्णसेवा केली. पतीच्या निधनानंतरही त्यांनी समाजसेवेचा ध्यास सोडला नाही. उलट अधिक जोमाने कार्य करत त्यांनी आपल्या मुलगा डॉ. राहुल मुठ्ठे, मुलगी डॉ. गौरी जोशी (पुणे) तसेच कुटुंबीयांना समाजसेवेची प्रेरणा दिली.
सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सक्रिय सहभाग
डॉ. अपर्णा ताई अनेक सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय होत्या. एव्हरग्रीन सीनियर सिटीजन क्लब, ब्राह्मण सेवा संघ, पोलीस दक्षता समिती, हास्य क्लब तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमी सहभाग असायचा. नाट्यप्रयोग, एकांकिका व विविध कार्यक्रमांत त्या स्वतः सहभाग घेत आणि इतरांनाही सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करत.
विशेष म्हणजे ८२ वर्षांच्या वयातही त्या तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने कार्यरत होत्या. कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन, पाहुण्यांची व्यवस्था, लोकांशी संपर्क अशा सर्व जबाबदाऱ्या त्या स्वतः पुढाकार घेऊन पार पाडत.
अमळनेरकरांची मोठी हानी
डॉ. अपर्णा मुठ्ठे यांच्या अचानक निधनामुळे अमळनेरच्या सामाजिक, सांस्कृतिक व वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे कार्य, त्यांचा उत्साह व समाजासाठी असलेली तळमळ पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील.
मुठ्ठे कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण अमळनेर शहर सहभागी असून परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.
“हजारो साल नर्गिस अपनी बेनूरी पर रोती है,
तब जाकर होता है चमन में एक दीदावर पैदा.”
— मकसूद बोहरी, अमळनेर

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें