
अमळनेर (अटकाव न्यूज ) – ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर यांच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात ग्राहकतीर्थ स्व. बिंदूमाधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी अमळनेर महिला मंचच्या अध्यक्षा व सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या स्व. डॉ. अपर्णा मुठ्ठे यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
हा कार्यक्रम अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या अमळनेरच्या अध्यक्षा सौ. स्मिता चंद्रात्रे यांच्या निवासस्थानी पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. डॉ. नयना नवसारीकर उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की, महिलांना सहानुभूती नको तर समान हक्क, अधिकार आणि त्यासोबत सन्मान व आदर मिळणे गरजेचे आहे. समाजात ही जबाबदारी पुरुषांनीही पार पाडली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्त्री आयुष्यात अनेक भूमिका पार पाडते. ती प्रथम मुलगी, नंतर भगिनी, पत्नी आणि पुढे आयुष्यभरासाठी माता असते. स्त्री कितीही मोठ्या पदावर गेली तरी घरातील चूल, मुलं, स्वयंपाक व घराची जबाबदारी ती मनापासून पार पाडत असते. त्यामुळे आजच्या प्रगत काळात परिस्थितीनुसार काही बदल आवश्यक असून पुरुषांनीही घरकामात सहभाग घेऊन पती-पत्नीने मिळून संसार आनंदाने चालवावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी कु. भार्गवी चंद्रशेखर पाटील हिने महिला दिनानिमित्त प्रभावी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रांत महिला आयाम प्रमुख अॅड. भारती अग्रवाल, सौ. वनश्री अमृतकर, सौ. उर्मिला अग्रवाल, सौ. कपिला मुठ्ठे, सौ. अंजू ढवळे, सौ. मेहराज हुसेन यांच्यासह जिल्हास्तरीय पदाधिकारी मकसूद बोहरी, सतीश देशमुख, विजय शुक्ला, सुनील वाघ, नरेंद्र बाळू पाटील, भाऊसाहेब देशमुख, गोकुळ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच निवृत्त तहसीलदार उपासनी साहेब यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाचे संचालन सौ. कपिला मुठ्ठे यांनी केले तर मान्यवरांचा परिचय अॅड. भारती अग्रवाल यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. स्मिता चंद्रात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








