
अमळनेर अटकाव न्यूज:-
दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी व्ही. झेड. पाटील हायस्कूल शिरुड येथे स्वातंत्र्य दिन सोहळा व बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सकाळी सर्वप्रथम शाळेच्या विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षकांसह गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. या फेरीत ग्रामपंचायत, वि.का. सोसायटी, श्री दत्त सार्वजनिक वाचनालय तसेच जिल्हा परिषद मराठी शाळा येथे ध्वजारोहण करण्यात आले. प्रभातफेरीची सांगता व्ही. झेड. पाटील हायस्कूलच्या आवारात झाली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. सौ. योजना जितेंद्र पाटील (शालेय समिती सदस्य) यांच्या हस्ते ध्वजस्तंभ पूजन करून ध्वजारोहण झाले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना गोडपदार्थ (बिस्किटे) वाटप केले.
शाळेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात विशेष प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कै. दादासाहेब रामदास आधार मोरे यांच्या स्मरणार्थ श्री. गुलाब रामदास मोरे यांनी विद्यार्थ्यांना वॉटर चिल्लर मशीन भेट दिली. तसेच गावातील श्री. योगेश लोटन बाविस्कर यांनी शाळेतील एका गळक्या वर्गखोलीचे पत्रे बदलून देण्याचे जाहीर केले. या दोन्ही दातृत्वपूर्ण उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत असून, ते विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. शाळा परिवाराने या दोन्ही दात्यांचा विशेष सत्कार करून त्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या भाषणात मान्यवरांनी देशभक्ती, शिक्षण, प्रामाणिकपणा व जबाबदारी या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. “विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा, बुद्धिमत्ता व क्षमता असून ती योग्य दिशेने वापरून समाज व देशाच्या प्रगतीत योगदान देणे हीच खरी देशभक्ती आहे,” असा संदेशही देण्यात आला.
या प्रसंगी शालेय समिती अध्यक्षा श्रीमती पुष्पलता अशोक पाटील, मुख्याध्यापक अनिल सूर्यवंशी, सर्व शालेय समिती सदस्य, गावातील पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वि.का. सोसायटी चेअरमन व सदस्य, सार्वजनिक वाचनालयाचे संचालक मंडळ, दूध उत्पादक सोसायटी संचालक मंडळ, पोलिस पाटील, आजी-माजी सैनिक, गावातील प्रशासकीय अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, माजी विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. देशभक्तीचा उत्साह, एकात्मतेची भावना आणि कृतज्ञतेची जाणीव यामुळे शिरुड गावातील हा स्वातंत्र्य दिन सोहळा संस्मरणीय ठरला.









