खासदार स्मिता वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; जळगाव जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र विस्ताराला चालना

अमळनेर दि. ७ ऑगस्ट :
जळगाव जिल्ह्याच्या शेतीला नवी उभारी देणाऱ्या पाडळसरे (निम्न तापी) धरण प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) अंतर्गत या महत्त्वाच्या प्रकल्पाचा समावेश करून तब्बल ८५९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या अधिकृत अधिसूचनेतून ही माहिती जाहीर झाली असून, यामुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अमलबजावणीला गती मिळणार आहे.
या प्रकल्पाला यापूर्वीच PIB मान्यता मिळाली होती, मात्र PMKSY योजनेत समावेश झाल्यामुळे निधी वितरण, प्रशासकीय मंजुरी आणि प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या प्रक्रियेला आता अधिकृत वेग मिळणार आहे. परिणामी, हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन शेती उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
खासदार स्मिता वाघ यांचा निर्णायक पाठपुरावा
खासदार स्मिता वाघ यांनी खासदार झाल्यापासून पाडळसरे प्रकल्पासाठी केंद्र व राज्य पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी लोकसभेत हा मुद्दा मांडत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी थेट चर्चा केली. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले.
निधी मंजुरीनंतर प्रतिक्रिया देताना खासदार वाघ म्हणाल्या,
“पाडळसरे प्रकल्पाच्या PMKSY योजनेतील समावेशामुळे केवळ निधी मिळाला नाही, तर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक नवी दिशा व नवसंजीवनी ठरेल. सिंचन सुविधा उपलब्ध झाल्याने शेती उत्पादन वाढेल, पीक विविधीकरण होईल व ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल.”
शेती व ग्रामीण विकासाला चालना
पाडळसरे प्रकल्पामुळे तापी नदीच्या पाण्याचा शाश्वत व कार्यक्षम वापर होईल. यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न सुटून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यात भर पडेल. ग्रामीण भागातील रोजगार संधी वाढतील आणि कृषी क्षेत्राचा विकास वेगाने होईल.
विशेष आभार प्रदर्शन
या प्रकल्पासाठी सहकार्य केलेल्या सर्वांना धन्यवाद देताना खासदार वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, तसेच आमदार अनिल पाटील यांचे विशेष आभार मानले.
या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील सिंचनाचा चेहरा बदलणार असून, हजारो शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी हा प्रकल्प विकासाचे नवे पर्व सुरू करणारा ठरणार आहे.









