
अमळनेर : दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्ताने बँकेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभ आणि गरजू, गंभीर रुग्णांसाठी आरोग्य सेवा साधनांचे लोकार्पण १० ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सकाळी ९ वाजता इंदिरा भवन, अमळनेर येथे संपन्न होणार आहे.
शतक महोत्सव साजरा करणाऱ्या बँकेने आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवत, बँकेचे सभासद ज्या पाल्यांनी इयत्ता १० वी व १२ वी परीक्षांमध्ये ७५% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत, अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान भेटवस्तू देऊन करण्यात येणार आहे. याकरिता सभासदांनी आपल्या गुणवंत पाल्यांचे गुणपत्रक (झेरॉक्स प्रती) बँकेच्या कार्यालयीन वेळेत व्यवस्थापक अमृत पाटील यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या वतीने गरजू आणि गंभीर रुग्णांसाठी उपचारांनंतर उपयुक्त ठरणारी महागडी आरोग्य सेवा उपकरणे प्रदान करण्यात येणार असून, त्याचे लोकार्पणही याच सभेच्या माध्यमातून होणार आहे.
या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे, व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, व्यवस्थापक अमृत पाटील व संचालक मंडळाच्या वतीने सर्व सभासदांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









