
अमळनेर : दिनांक २६ जून २०२५ रोजी गुरुवारी कै. एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, धार मालपूर येथे युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. उमाकांत साळुंखे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. केंद्रप्रमुख श्री. गोकुळ (आबा) आनंदा पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. ए. पाटील सर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर सत्कार समारंभ पार पडला. विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या कार्यावर भाषणे सादर केली. सातवीतील हेमांगी शांताराम पाटील, भावना पाटील तसेच आठवीतील दिव्या रवींद्र पाटील आणि उन्नती केशव पाटील यांनी प्रभावी भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख पाहुणे श्री. गोकुळ पाटील यांनी शाहू महाराजांचे विचार मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक करताना प्रा. अशोक पवार यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
“हजारो राजे झाले पण माणसातला राजा आणि राजातला माणूस हाच खरा राजा,” असे उद्गार काढत शाहू महाराजांचा आदर्श उभा करण्यात आला. सामाजिक न्याय, शिक्षण, उद्योगधंदे, सांस्कृतिक क्षेत्र आणि बहुजन कल्याणासाठी त्यांनी दिलेले योगदान अधोरेखित करण्यात आले.
राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल (जि. कोल्हापूर) येथे झाला. त्यांनी २८ वर्षे राज्यकारभार केला. शिक्षण, स्त्री-सक्षमीकरण, अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी घेतलेले निर्णय आजही आदर्शवत ठरतात.
कोल्हापूर संस्थानात सार्वजनिक स्थळांवर अस्पृश्यांना प्रवेश, विधवांच्या पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता, देवदासी प्रथा बंद करण्यासाठी कायदा, तसेच वेदोक्त मंत्र सांगण्याचा हक्क देणारा वेदोक्त संघर्ष यासारख्या ऐतिहासिक निर्णयांमुळे ते सामाजिक क्रांतीचे अग्रदूत ठरले.
शिक्षण, शेती, उद्योग, कला, सहकार आणि समाजविकास यामध्ये त्यांनी नवोन्मेष केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘मूकनायक’ साप्ताहिकासाठी आर्थिक मदत करून त्यांनी सामाजिक आंदोलनास बळ दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी, विशेषतः आर. ए. पाटील, डी. ए. पाटील, एस. ए. पाटील, क्षीरसागर सर, सुनंदा पाटील मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एम. व्ही. पाटील सर यांनी केले.
अशा या समाजसुधारक, लोकनेते, शिक्षणतज्ञ राजाला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.









