
अमळनेर (अटकाव न्यूज ) –
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि दि. अमळनेर को-ऑप. अर्बन बँकेच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य संवर्धनाचा उद्देश समोर ठेवत भव्य मोफत समग्र आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. अमळनेर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, जिल्हा उपनिबंधक कार्यालय अमळनेर, सहाय्यक निबंधक कार्यालय (सहकार विभाग) आणि लायन्स क्लब, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर ४ जुलै २०२५, शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता, पू. सानेगुरुजी पुतळा समोर, स्टेशन रोड, अमळनेर येथील दि. अमळनेर अर्बन बँकेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
या भव्य आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मुंबई येथील नामांकित जनरल डायग्नोस्टिक लॅबोरेटरी तर्फे विविध प्रकारच्या चाचण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. या चाचण्यांची अंदाजे बाजारमूल्य सुमारे ₹३५००/- इतकी असून त्यामध्ये खालील तपासण्या समाविष्ट आहेत:
🔹 थायरॉईड प्रोफाइल – ३ चाचण्या
🔹 किडनी प्रोफाइल – ७ चाचण्या
🔹 HbA1c (साखर नियंत्रणासाठी) – २ चाचण्या
🔹 लिव्हर फंक्शन टेस्ट (यकृत तपासणी) – ११ चाचण्या
🔹 CBC (पूर्ण रक्त तपासणी – हिमोग्राम) – २८ चाचण्या
🔹 लिपिड प्रोफाइल (कोलेस्ट्रॉल तपासणी) – ८ चाचण्या
🔹 आयर्न स्टडीज (लोह तपासणी) – ३ चाचण्या
या तपासण्यांमुळे नागरिकांना वेळेवर विविध आजारांची पूर्वकल्पना घेता येणार असून, आवश्यक त्या वैद्यकीय सल्ल्याची दिशा यामुळे मिळू शकेल.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी दि. अमळनेर अर्बन बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक, बँकेचे कर्मचारी, पिग्मी एजंट, तसेच लायन्स क्लबचे सदस्य आणि इतर नागरिक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे, व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, बँकेचे सर्व संचालक मंडळ, तसेच लायन्स क्लब अमळनेरचे प्रेसिडेंट डॉ. संदीप जोशी, सेक्रेटरी महेंद्र पाटील, ट्रेझरर नितीन विंचूरकर व सभासद, तसेच बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांनी केले आहे.
या उपक्रमामुळे आरोग्यविषयक जनजागृती होऊन नागरिकांना मोफत तपासण्यांच्या माध्यमातून वैद्यकीय लाभ मिळणार आहे. अमळनेर शहरात समाजोपयोगी सेवाभावातून उभ्या राहिलेल्या या शिबिराचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
