
अमळनेर (अटकाव न्यूज) :
शिवाजीनगर येथील दत्त मंदिर परिसरात महिला पतंजली समितीच्या माध्यमातून योगपीठाच्या तत्त्वानुसार अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लायन्स क्लबच्या महिला पदाधिकारी व सदस्यांचा देखील मोठा सहभाग होता. संपूर्ण परिसर महिलांच्या उपस्थितीने भरून गेला होता.
या योग महोत्सवाचे प्रायोजक दादासो प्रताप शिंपी व मनीषा ताई शिंपी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले. या उपक्रमात योग शिक्षिका सौ. ज्योतीताई चंद्रकांत पाटील यांनी विविध योगासने व प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक घेतले. त्यांच्या सहकार्याला सहयोगी शिक्षिका कामिनी पवार आणि ज्योती माळी यांचेही मोलाचे योगदान लाभले.
कार्यक्रमात उपस्थित महिलांनी तणावमुक्त जीवनशैलीसाठी योगशास्त्राचे महत्त्व जाणून घेतले आणि विविध आसनांचा अनुभव घेतला. योगासन, प्राणायाम व ध्यान याच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे टिकवता येते, याचे मार्गदर्शन प्रशिक्षिकांनी साधेपणाने केले.
कार्यक्रमाच्या शेवटी लहानग्या बाल योगी अनुश्री मनोज चौधरी हिने सादर केलेले सुंदर योगासन सर्वांचे विशेष आकर्षण ठरले. तिच्या लवचिकतेला आणि आत्मविश्वासाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे योगसंस्कारांचा प्रसार होत असून, महिलांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता वाढत असल्याचे मत सहभागी महिलांनी व्यक्त केले.
