
अमळनेर, ( अटकाव न्यूज ) – भालेरावनगर व पाटीलगढी, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “गुणगौरव सोहळ्या”ने आज एक अनोखी ऊर्जावान आणि प्रेरणादायी परंपरा घडवली. इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा, लोकनायक पुरस्कार प्राप्त बापूसाहेब संदीप पाटील (मा. जि.प.सदस्य, जळगाव) यांचा आणि आबासाहेब गोकुळ पाटील (मा. केंद्रप्रमुख, पं. स. अमळनेर) यांची तज्ञ शिक्षण संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या त्रिवेणी संगमाचे रूप घेतलेले समारंभाचे ठिकाण होते मुंदडा अपार्टमेंट, अमळनेर.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री श्रीराम हरचंद पाटील (ग्रेडेड मुख्याध्यापक) यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री गोकुळ पाटील, विलास पाटील, व्ही. ए. पाटील, गंगाधर अहिरराव, हरिचंद्र कढरे, श्री रामलाल आत्माराम पाटील या विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. प्रस्तावना बापूसाहेब विजय पाटील रत्नापिंप्रीकर यांनी केली.
विद्यार्थ्यांचा यशोमहोत्सव
या कार्यक्रमात एकूण 19 गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये पालकांचाही सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांपैकी मोहन गणेश पाटील, प्रिया शरद चौधरी, आदित्य लक्ष्मण पाटील यांनी आपल्या मनोगतातून यशामागची मेहनत आणि प्रेरणा व्यक्त केली. पालकांमध्ये श्री लक्ष्मण पाटील आणि श्री बाविस्कर सर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गौरवाचा क्षण – लोकनायक पुरस्कारप्राप्त बापूसाहेब संदीप पाटील यांचा सत्कार
बापूसाहेब संदीप पाटील यांना “लोकनायक पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल नानासाहेब श्रीराम पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. बापूसाहेब यांनी आपल्या मनोगतातून जलसंधारण, लोकहिताचे उपक्रम, पाणी फाउंडेशन, जलजीवन मिशन अशा सामाजिक कार्यातील योगदानाची माहिती देताना, “लोकसेवा हीच खरी पूजा” ही भावना व्यक्त केली.
तज्ञ शिक्षण संचालकपदी नियुक्त गोकुळ पाटील यांचे मार्गदर्शन
गोकुळ पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषणातून “आम्ही घडलो, तुम्हीही घडाना” या उक्तीवर भर दिला. त्यांनी यश मिळवण्यासाठी इच्छाशक्ती, सातत्य, संयम, वेळेचे व्यवस्थापन आणि योग्य मार्गदर्शन यांची गरज अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, “तुमच्यातच समस्त ब्रह्मांडाची शक्ती आहे, ती जागवण्याची वेळ आली आहे.” शिक्षण ही केवळ महागड्या पैशांची गोष्ट नसून मेहनतीची आणि गुणवत्तेची बाब आहे हे सांगतानाच त्यांनी कॉलनीतील यशस्वी विद्यार्थी डॉ. डी. जी. पाटील यांचा उदाहरणाद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
गुणवंत शिक्षकांचा विशेष गौरव
या प्रसंगी “बेस्ट टीचर अवॉर्ड” गुणवंत शिक्षक श्री महेंद्र वसंतराव काटे यांना देऊन त्यांचा सत्कार श्री अनिल दुसाने सर यांनी केला. सूत्रसंचालन बापूसाहेब विजय पाटील यांनी आपल्या नेहमीप्रमाणे उत्कृष्ट आणि सुसंवादी पद्धतीने पार पाडले.
कार्यक्रमाचा समारोप
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना श्री नानासाहेब श्रीराम पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आभारप्रदर्शन श्री भाऊसाहेब रामकृष्ण पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करणारे हात
कार्यक्रमाच्या यशामागे भालेरावनगर व पाटीलगढीतील सर्व तरुण मित्रमंडळ, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्त्यांचे योगदान मोलाचे ठरले. विशेषतः श्री रामकृष्ण पाटील (जिल्हाध्यक्ष – अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स) यांनी संयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
हा कार्यक्रम केवळ सत्काराचा नव्हे तर एक प्रेरणेचा झरा ठरला, जो पुढील पिढीला उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याची दिशा दाखवणारा ठरतो.









