
अमळनेर: शिरूड (प्रतिनिधी) – संसदेत प्रभावी आणि उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती स्मिता उदय वाघ यांना सन 2025 सालचा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला असून, देशभरातील केवळ 17 उत्कृष्ट खासदारांमध्ये त्यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे, या यादीत निवड होणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला खासदार ठरल्या आहेत. त्यांच्या या ऐतिहासिक आणि गौरवशाली यशामुळे जळगाव जिल्ह्यात आणि शिरूड गावात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण पसरले आहे.
या उल्लेखनीय सन्मानानिमित्त व्हि. झेड. पाटील हायस्कूल शिरूड शालेय समितीच्यावतीने खासदार श्रीमती स्मिता वाघ यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. शाळेत झालेल्या एका छोटेखानी पण उत्साहपूर्ण कार्यक्रमात विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात शालेय समिती अध्यक्षा श्रीमती पुष्पलता अशोक पाटील, माजी पणन संचालिका सौ. तीलोत्तमा पाटील, पंचायत समिती अमळनेरचे सभापती श्री. शाम अहिरे, शालेय समिती सदस्य काळू नाना पाटील, वसंत भगवान पाटील, पुंजू एकोबा पाटील, शिक्षक डी. ए. धनगर सर, अरविंद रंगराव पाटील सर, बापूराव भिवसन महाजन (चेअरमन, वि.का.सो.), गोविंद मच्छिंद्र सोनवणे (सरपंच) आणि मुख्याध्यापक अनिल सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात उपस्थित शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात खासदार वाघ यांच्या कार्याचे कौतुक केले. विशेषतः महिला नेतृत्वाने मिळवलेले हे मोठे यश ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
खासदार वाघ यांनी आपल्या संसदीय कार्यकाळात विविध विषयांवर संसदेत प्रभावीपणे चर्चा घडवून आणली, प्रश्न उपस्थित केले तसेच मतदारसंघातील विकास कामांवर विशेष लक्ष केंद्रित केले. यामुळेच त्यांना संसद रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
शिरूड गावात त्यांच्याविषयी अभिमान व्यक्त करताना ग्रामस्थांनी सांगितले की, “स्मिता वाघ यांच्या यशामुळे आमच्या गावात जणू काही आपल्या घरच्याच व्यक्तीने मोठं पद मिळवल्याचा आनंद होत आहे.”
हा सत्कार कार्यक्रम संपूर्ण गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला असून, संसदेत उत्कृष्ट कामगिरी करून ग्रामीण महाराष्ट्राच्या झेंड्याला उंची गाठवणाऱ्या स्मिता वाघ यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.









