पत्रकार समाधान मैराळे यांचा मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर (अटकाव न्यूज ) : अमळनेर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. येथील सुप्रसिद्ध पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेले समाधान एकनाथ मैराळे यांना मॅजिक अ‍ॅन्ड आर्ट युनिव्हर्सिटी, हरियाणा यांच्या वतीने मानद डॉक्टरेड (Honorary Doctorate) पदवीने गौरविण्यात आले आहे.

दिनांक १४ जून २०२५ रोजी दिल्ली येथील भव्य समारंभात ही मानाची पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. सुप्रीम कोर्टाचे प्रसिद्ध वकील डॉ. राम अवतार शर्मा, दिल्ली पोलिसातील वरिष्ठ अधिकारी किरण सेठी यांच्या हस्ते हे सन्मानपत्र आणि डॉक्टरेटची मानद पदवी देण्यात आली.

ही पदवी देण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून देशभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून अर्ज मागवण्यात आले होते. त्यानंतर अर्जांची पारदर्शक व काटेकोर छाननी करून देशातील केवळ ३८ गुणवंतांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्र राज्यातून केवळ दोनच जणांची निवड झाली असून, त्यात अमळनेर येथील समाधान मैराळे यांचा गौरव होणे, हे शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे.

समाधान मैराळे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, सामाजिक प्रश्नांवर नेहमी स्पष्ट व निर्भीड भूमिका घेतात. त्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक, आणि ग्रामीण विकास विषयक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे काम त्यांनी आपल्या लेखणीतून सातत्याने केले आहे.

या प्रतिष्ठेच्या सन्मानाबद्दल समाधान मैराळे यांचे अमळनेर शहरात आणि परिसरात सर्वत्र जोरदार स्वागत व सत्कार होत असून, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशामुळे अमळनेरचा गौरव वाढला असून, तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरणारे कार्य त्यांनी केले आहे.


या गौरवाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना समाधान मैराळे म्हणाले, “ही मानद पदवी म्हणजे केवळ माझा सन्मान नसून, ही माझ्या कार्याला दिलेली मान्यता आहे. हा सन्मान माझ्या गावासाठी, माझ्या जिल्ह्यासाठी आहे. यामुळे माझ्या सामाजिक कार्याची जबाबदारी अधिक वाढली आहे.”


समारंभाच्या वेळी देशभरातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मैराळे यांच्यासोबत अनेक सहकाऱ्यांनी दिल्ली गाठून त्यांचा उत्साहवर्धन केला.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें