
विद्या विहार कॉलनी, मुंदडा नगर परिसरातील महिलांचा नगरपरिषदेकडे मोर्चा
अमळनेर – गेल्या 15 ते 20 दिवसांपासून प्रभाग क्रमांक 14 मधील विद्या विहार कॉलनी, मुंदडा नगर आणि अन्य 15 ते 20 कॉलनींमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे स्थानिक रहिवासी विशेषतः महिलांचे हाल सुरू असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत.
या समस्येचा मुख्य कारण ठरत असलेला 80 फुटी रिंगरोड ठेकेदार वारंवार पाईपलाइन फोडत आहे, त्यामुळे पाणीपुरवठा खंडित होतो. या संदर्भात नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील यांनी 21 मार्च रोजी नगरपरिषदेकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई झाली नाही, तसेच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.
मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात महिलांचा ठिय्या
गेल्या 20 दिवसांपासून पाण्याची गैरसोय होत असल्याने नागरिक आणि विशेषतः महिलांचा संताप अनावर झाला. नगरपरिषदेकडे निवेदन देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने महिलांनी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक रहिवासी, नगरसेविका कमलबाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढत मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनामुळे प्रशासनाला जाग आली आणि मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी तातडीने आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी
या आंदोलनात रवि पाटील, मिलींद आप्पा, संजय पाटील, मुकेश पाटील, अमोल पाटील, कल्पेश साळुंखे, शेवाळे ताई, माळी ताई, शिंदे ताई यांच्यासह 100 ते 150 महिलांनी सहभाग घेतला. प्रशासनाने लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
पाणीपुरवठा नियमित होईपर्यंत नागरिकांचा संघर्ष सुरूच राहणार
या भागातील रहिवाशांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली असून, जर लवकरच पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर अधिक मोठे आंदोलन उभे राहील, असा इशारा दिला आहे. नागरिकांनी प्रशासनाकडून त्वरित उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
