
अमळनेर – वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमळनेर येथे बजाज ऑटो लिमिटेड आणि टाटा Strive यांच्या संयुक्त विद्यमाने बजाज मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम (BMS) प्रमाणपत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये संस्थेच्या इलेक्ट्रिशियन आणि फिटर विभागातील प्रथम व द्वितीय वर्षातील एकूण 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, यापैकी 30 विद्यार्थ्यांनी कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला.
हा कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बजाज कंपनीतर्फे प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि बॅच बिल्ला देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी बजाज मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम (BMS) प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर श्री. सचिन करारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे प्राचार्य प्रकाश पाटील सर, प्रमोद पाटील सर, समाधान शिरसाठ सर आणि विजय चौधरी सर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उत्पादन व्यवस्थापन, गुणवत्ता सुधारणा आणि औद्योगिक कौशल्यविषयक तांत्रिक ज्ञान प्राप्त झाले.
या प्रमाणपत्र कोर्समुळे विद्यार्थ्यांचे औद्योगिक कौशल्य विकसित होऊन त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. संस्थेने घेतलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
