पावसातही उत्साहाची लाट – २२२ तरुणांनी केले रक्तदान,  इतिहास घडला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर, दि. ५ (अटकाव न्युज ):
जश्ने ईद-ए-मिलादूनबीच्या १५०० व्या पवित्र जन्मदिनाच्या निमित्ताने अमळनेर शहरात मुस्लिम समाजातील तरुणांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे पार पडलेल्या या शिबिरात तब्बल २२२ तरुणांनी रक्तदान करीत विक्रमी इतिहास रचला.

पावसातही उसळला उत्साह

दिवसभर संततधार सुरू असतानाही रक्तदानासाठी तरुणाईचा ओघ थांबला नाही. लांबच लांब रांगा लागून उत्साही युवकांनी समाजोपयोगी उपक्रमाला प्रतिसाद दिला. शिबिराचे उद्घाटन पोलीस उपविभागीय अधिकारी कोते साहेब आणि पोलीस निरीक्षक निकम साहेब यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती

या उपक्रमाला उलमा-ए-केराम, मुबल्लिगीन हजरात, माजी नगरसेवक, डॉक्टर, वकील, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, ईदगाह कब्रस्तान कमिटी, मस्जिद-मदरसा ट्रस्टी, नवजवान फ्रेंड सर्कल आदी मान्यवरांनी हजेरी लावली. रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

“रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान”

“रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, जात-पात-धर्म वा पद न पाहता माणुसकी म्हणून समाजोपयोगी उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे,” असे आवाहन पोलीस निरीक्षक निकम साहेब यांनी यावेळी केले. तर आयोजकांनीही “प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा रक्तदानाचा संकल्प करावा” अशी विनंती केली.

समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग

या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे विविध समाजघटकांनी धार्मिक वा जातीय भेदभाव बाजूला ठेवून मानवतेच्या सेवेसाठी एकत्र येत सहभाग नोंदवला. मान्यवरांचे शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

रक्तसंकलन आणि आभार

रक्तसंकलनाची जबाबदारी जीवन श्री ब्लड बँकने पार पाडली. त्यांच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

मानवतेच्या इतिहासातील सुवर्णक्षण

मुस्लिम समाजातील तरुणांनी केलेले हे विक्रमी रक्तदान शिबिर अमळनेर शहरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. “रक्तदान सर्वश्रेष्ठ दान” हा संदेश अधिक दृढ होत, समाजसेवेच्या इतिहासात या भव्य उपक्रमाने सुवर्णपानाची भर टाकली.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें