
अमळनेर (अटकाव न्यूज ):
शहरातील शिरूड नाका परिसरातील ३६ खोली भागात रविवारी रात्री (३१ ऑगस्ट) साडेनऊ वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. स्वतःच्या सख्ख्या मुलाने लोखंडी हातोडी डोक्यात मारून पित्याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.
राजेंद्र दत्तात्रय रासने (वय ६५) हे रक्ताच्या थारोळ्यात गंभीर अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती ऋत्विक भामरे यांनी पोलिस अमोल पाटील व जितेंद्र निकुंभे यांना दिली. तत्काळ पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, एपीआय रवींद्र पिंगळे, सपोनि सुनील लोखंडे, पो.उ.नि. शरद काकळीज, समाधान गायकवाड, हेडकॉन्स्टेबल लक्ष्मीकांत शिंपी, तसेच अन्य पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
जखमी राजेंद्र रासने यांना तातडीने दवाखान्यात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक चौकशीत राजेंद्र यांचा मुलगा भूषण राजेंद्र रासने (वय ३६) यानेच हातोडीने डोक्यात प्रहार केल्याचे उघड झाले.
फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळावरून नमुने संकलित केले असून खूनासाठी वापरलेली लोखंडी हातोडी पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी अमोल पाटील यांच्या फिर्यादीवरून भूषण रासनेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.उ.नि. शरद काकळीज यांच्याकडे सुरू आहे.
