
अमळनेर (अटकाव न्यूज ):
जळगाव जिल्हा महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेवर प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील प्रा. किरण अशोक पाटील यांची तज्ज्ञ संचालक म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. कार्यकारी मंडळाच्या बैठकीत झालेल्या या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून, त्यांच्या नियुक्तीबद्दल संस्थेतील सभासद, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सन १९८७ मध्ये स्थापन झालेल्या या पतसंस्थेचे सभासदत्व जळगाव जिल्ह्यातील विविध वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांना आहे. स्थापनेपासून संस्थेने शिक्षकवर्गाच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी व प्रगतीसाठी सातत्याने कार्य केले असून, गेल्या काही दशकांत संस्थेची घोडदौड झाली आहे. अशा या पतपेढीच्या तज्ज्ञ संचालकपदी प्रा. किरण पाटील यांची झालेली नियुक्ती ही एक महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे.
या निवडीप्रसंगी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक प्राचार्य डॉ. अनिल पाटील, चेअरमन प्रा. डॉ. राजेंद्र पाटील, व्हा. चेअरमन प्रा. डॉ. विजय सोनजे, भालोद कॉलेजचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे, प्रा. डॉ. किशोर पाटील, प्रा. सुरेश अत्तरदे, प्रा. डॉ. अतुल देशमुख, प्रा. डॉ. शैलेशकुमार वाघ, प्रा. डॉ. संजीव साळवे, प्रा. डॉ. सौ. सुनिता चौधरी, प्रा. डॉ. स्वाती शेलार, प्रा. राजेश पाटील, प्रा. डॉ. प्रशांत पाटील, सुभाष वाघ, संजय इंगळे, प्रसाद भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी प्रा. किरण पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या नियुक्तीबद्दल पतपेढीचे कार्यकारी संचालक मंडळ, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, खा.शी. संचालक मंडळ, पत्रकार संघटना तसेच मित्रपरिवाराकडूनही प्रा. किरण पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.
प्रा. किरण पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा घेतलेला हा गौरव भविष्यात पतसंस्थेच्या बळकटीकरणात आणि सभासदांच्या हितसंबंध वृद्धिंगत करण्यात निश्चितच मोलाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
