द्रौ.रा. कन्या शाळेत शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळा संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर,( अटकाव न्यूज ) :
येथील श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळेत अमळनेर नगरपरिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत नगरपरिषदेच्यावतीने विद्यार्थिनींना शाडू मातीचे वाटप करण्यात आले. शाळेचे कलाशिक्षक श्री. डी. एन. पालवे व श्री. एस. एस. माळी यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मूर्ती बनविण्याची सविस्तर माहिती विद्यार्थिनींना दिली. त्यानंतर सकाळ व दुपार विभागातील मिळून पाचशेहून अधिक विद्यार्थिनींनी स्वतःच्या हातांनी शाडू मातीचे गणपती तयार केले.

बनविलेल्या सर्व गणेशमूर्ती एक दिवस सुकवण्यासाठी ठेवण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी विद्यार्थिनींनी त्यावर आकर्षक रंगकाम करून मूर्तींना सुंदर स्वरूप दिले. त्यानंतर शाळेतच सर्व गणेशमूर्तींचे एकत्रित प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनाला पालक व स्थानिक नागरिकांनीही भेट देऊन विद्यार्थिनींच्या कलेचे कौतुक केले.

या उपक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षिका सौ. एस. पी. बाविस्कर, सौ. आर. एस. सोनवणे, श्री. कैलास बाविस्कर तसेच लिपिक श्री. शाम पवार यांनी विशेष सहकार्य केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सकाळ व दुपार विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनापासून प्रयत्न केले.

शाळेत आयोजित हा उपक्रम केवळ कलात्मकता विकसित करणारा नव्हे, तर ‘आपला सण – आपले दायित्व’ या भावनेतून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेशही देणारा ठरला.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें