
विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी जाहीर केली आर्थिक मदत
अंतुर्ली-रंजाणे (प्रतिनिधी) –
गावाच्या विकासात शैक्षणिक प्रेरणा हीच खरी भांडवल ठरते, याचे उत्तम उदाहरण आज रंजाणे गावातील ज्येष्ठ सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी श्री. अण्णासाहेब डी.झेड. ठाकूर यांनी घालून दिले. तालुका अमळनेर येथील नवीन माध्यमिक विद्यालय, अंतुर्ली-रंजाणे येथे त्यांनी सदिच्छा भेट दिली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर.बी. पाटील यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अण्णासाहेबांचा सन्मानपूर्वक सत्कार केला. त्यांच्यासमवेत आलेल्या चिरंजीव श्री. दादासाहेब किशोर ठाकूर यांचाही शाल-श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अण्णासाहेब ठाकूर म्हणाले की, “गावातील विद्यार्थी हेच भविष्यातील समाजघटक आहेत. ग्रामीण भागातूनही अनेक प्रतिभावंत उदयास येतात. फक्त शिक्षणाबाबत प्रामाणिकपणा, जिद्द आणि चिकाटी लागते.” त्यांनी इ.१० वी शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास दरवर्षी बचत ठेव रक्कम ₹२१,५५१ च्या व्याजातून रोख बक्षीस देण्याचा उदात्त मनोदय जाहीर केला.
त्यांच्या या घोषणेने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेची भावना वाढेल, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.
अण्णासाहेब ठाकूर यांनी आपल्या दीर्घ सेवाकाळात जिल्हा प्रशासनात विविध पदांवर कार्य करताना प्रामाणिकपणा, शिस्त आणि जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. सेवानिवृत्तीनंतरही ते सामाजिक, शैक्षणिक आणि ग्रामीण भागातील प्रगतीसाठी सक्रिय आहेत. त्यांच्या या सदिच्छा भेटीने विद्यालयाचा गौरव वाढल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी विद्यालयाच्या वतीने उपशिक्षिका श्रीमती बैसाणे मॅडम यांनी आभार मानले.
