
शेवटी पत्रकार संघाच्या लढ्याला यश – खोट्या गुन्ह्यांमुळे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची उचलबांगडी
अमळनेर (अटकाव न्यूज ): पाचोरा येथील पत्रकार तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा व इतर तीन पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी अखेर पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांची बदली जळगाव नियंत्रण कक्षात करण्यात आली असून त्यांच्या जागी राहुलकुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलने झाली. विविध जिल्ह्यांमध्ये निवेदने सादर करण्यात आली. विशेषतः जळगाव येथील जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करीत पत्रकारांनी आपला निषेध नोंदवला. त्या वेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने इशारा दिला होता की, पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची तात्काळ बदली न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडले जाईल.
प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत शनिवारी अखेर पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची बदली केली. मात्र केवळ बदली पुरेशी नाही, त्यांच्या विरोधात सखोल चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया सेलचे नाशिक विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे यांनी केली आहे.
या संपूर्ण लढ्यामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी दिलेल्या नेतृत्वामुळे अखेर पत्रकार बांधवांवरचा अन्याय दूर झाला. त्यामुळे पत्रकार समाजात समाधान व्यक्त होत असून, संघाच्या या यशस्वी लढ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
— पत्रकार हितासाठी अखंड लढा देणारा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पुन्हा एकदा अग्रस्थानी!









