संत सोमगीर विद्यालयाच्या पूर्वा जाधवची राष्ट्रीय नाट्य विद्यालयात दिल्लीत झेप : ‘फंटुस चिल्लर’ मध्ये प्रमुख भूमिका, अभिनयाने जिंकली सर्वांची मने

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर (अटकाव न्यूज ) : संत सोमगीर विद्यालय, भिलाली (ता. पारोळा, जि. जळगाव) येथील इयत्ता ८ वीतील विद्यार्थिनी पूर्वा विशाल जाधव हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर थेट राष्ट्रीय नाट्य विद्यालय, दिल्ली येथे आपली छाप पाडत एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे.

राष्ट्रीय नाट्य विद्यालय, दिल्ली आणि दिल्ली पर्यटन व परिवहन विकास निगम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘रंग अम्लान 2025’ या राष्ट्रीय बालनाट्य महोत्सव व अभिनय कार्यशाळेसाठी देशभरातून 850 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातून केवळ उत्कृष्ट अभिनय प्रतिभा असलेल्या 250 मुलांचे एप्लीकेशन्स मान्य करण्यात आले, व त्यापैकी अंतिम 150 बालकलाकारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात आली.

ही निवड ज्येष्ठ रंगकर्मी रोहित त्रिपाठी, राजीव गौरसिंह, लोकेंद्र त्रिवेदी, अविनाश देशपांडे, वीरेंद्र कुमार यांच्यासह राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी विद्यार्थी पार्थ हजारिका, बिनोद महाकुर, विजय राजवंशी, पुनीत नंदा, कुणाल भांगे यांच्या समितीने पार पाडली.

या कार्यशाळेसाठी निवड झालेली पूर्वा जाधव हिने 20 जून ते 30 जून 2025 या कालावधीत दिल्लीत झालेल्या दहा दिवसीय अभिनय कार्यशाळेमध्ये भाग घेतला. कार्यशाळेदरम्यान तिने आपल्या उत्स्फूर्त अभिनयाने सर्व प्रेक्षक आणि प्रशिक्षणार्थी यांची मने जिंकली. कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी सादर झालेल्या ‘फंटुस चिल्लर’ या बालनाट्यात तिने प्रमुख भूमिका साकारली. या शानदार अभिनयासाठी तिला राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे निदेशक चितरंजन त्रिपाठी यांच्या हस्ते विशेष प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

पूर्वा ही अगोदरपासूनच विविध शालेय व राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांमध्ये सक्रीय असून, अंतरशालेय विज्ञान महोत्सव, राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा अशा अनेक ठिकाणी तिने पुरस्कार पटकावले आहेत. तिचे वडील रंगकर्मी विशाल जाधव व काका अमोल जाधव यांच्या मार्गदर्शनाने तिची सांस्कृतिक वाटचाल अधिकच बहरत आहे.

पूर्वाच्या या यशाबद्दल श्री स्वामी समर्थ शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री मनोज पाटील सर, शाळेचे मुख्याध्यापक अविनाश पाटील सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी तिचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.

पूर्वा जाधवने मिळवलेले हे यश केवळ तिच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण भिलाली परिसर, पारोळा तालुका आणि जळगाव जिल्ह्यासाठीही अभिमानास्पद आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण जिल्ह्याचे शुभेच्छा आहेत.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें