
अमळनेर : तालुक्यातील शिरूड गावातील छत्रपती शिवाजी महाराज सेवापूर्ती अभ्यासिकेला विधान भवन, मुंबई येथील कमांडिंग ऑफिसर बाळासाहेब पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. या भेटीवेळी त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते संजय साटोटे आणि अविनाश संदानशिव हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभ्यासिकेच्या वतीने कमांडिंग ऑफिसर बाळासाहेब पाटील यांचा सत्कार अतुल सोनवणे आणि डी.ए. धनगर यांनी केला. यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पाटील यांनी आपला मौलिक अनुभव आणि विचार विद्यार्थ्यांशी मांडले.
“यशाला कोणताही शॉर्टकट नसतो,” असे स्पष्ट करत त्यांनी सातत्य, सचोटी, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन यावर भर दिला. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवावा आणि अडचणींचा सामना सकारात्मकतेने करावा, असा सल्ला त्यांनी दिला.
विधान भवनातील अद्यावत ग्रंथालयाची माहिती देताना त्यांनी इच्छुक विद्यार्थ्यांना तेथे भेट देण्याचे निमंत्रण दिले. तसेच, कोणत्याही पुस्तकाची आवश्यकता भासल्यास ती पुस्तके तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना त्यांनी अधिकाऱ्यांच्या यशामागील त्याग, समर्पण व कष्ट यांचा उल्लेख केला. “फक्त मोठी पदे, बंगले किंवा गाड्या पाहून प्रेरणा घेण्यापेक्षा त्या मागे असलेले कष्ट समजून घेतल्यास तुम्हीही तेथे पोहोचू शकता,” असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात एवढ्या आधुनिक पद्धतीची अभ्यासिका उभारल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे आणि आयोजकांचे मनःपूर्वक कौतुक केले. अभ्यासिकेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये असलेली ऊर्जा, स्वयंस्फूर्ती आणि शिस्त पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील अधिकाधिक विद्यार्थी यशस्वी अधिकारी बनावेत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला डी.ए. धनगर, अतुल सोनवणे, तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थी कल्पेश पाटील, जगदीश शिंपी, मयूर पाटील, दिग्विजय कोळी, निखिल पाटील आणि इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









