
पिंपळे बु ( अमळनेर ) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त कै. सु.आ.पाटील माध्यमिक विद्यालय, पिंपळे बु. येथे दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थितांनी सामूहिकरित्या बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करत त्यांची जयंती साजरी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक नानासो श्री. डी.बी. पाटील सर यांनी अत्यंत नेटकेपणाने पार पाडले. प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले श्री. एम. पी. निकम सर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या समाजसुधारणेतील कार्य, संविधान निर्मितीतील योगदान आणि शिक्षणविषयक दूरदृष्टीवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहनही केले.
श्रीमती शिरसाठ मॅडम यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी केलेल्या योगदानावर भाष्य केले. त्यांनी विशेषतः सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता आणि दलितांसाठी उभारलेल्या लढ्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बापूसो श्री. सी.एन. पाटील सर होते. त्यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेबांच्या शिक्षणावरील श्रद्धेचा उल्लेख करत, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी उदाहरण घेऊन शिक्षणात प्रगती करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषण स्पर्धेत भाग घेतला. यामधील निवडक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून निकम सरांकडून ‘पेन’ बक्षीस म्हणून देण्यात आले.
या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी अंकुश पाटील तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण असा झाला.
