
अमळनेर – निम्न तापी प्रकल्पातील पाडळसरे धरणाचे काम वेगाने सुरू असून, पुढील दोन वर्षांत धरणात पाणी अडवले जाईल, असे आश्वासन तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता ज. द. बोरकर यांनी दिले. जळगाव येथे त्यांच्या दालनात पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
बैठकीत अभियंता बोरकर यांनी सांगितले की, टाय प्लेट धरण स्थळी पोहोचले असून गेटसाठी गरडर बसवण्याचे काम सुरू आहे. यंदाच्या वर्षी जूनपर्यंत उपलब्ध निधीचा संपूर्ण वापर केला जाईल. पुढील वर्षी निधी मिळाल्यास महाकाय गेट उभारणीसह धरणाच्या कामाला अंतिम स्वरूप दिले जाईल. त्यामुळे दोन वर्षांत धरणात पाणी साठवता येईल.
उपसा सिंचन योजना आणि पाईपलाईनच्या कामालाही गती
पाडळसरे धरणाच्या कामासोबत उपसा सिंचन योजना व पाईपलाईन यांचेही काम समांतरपणे सुरू आहे. यासाठी पंपिंग स्टेशनच्या उभारणीसाठीही प्रयत्न सुरू आहेत. या संपूर्ण प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होणार आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेशाची मागणी
बैठकीत पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, हेमंत भांडारकर, अमळनेर अर्बन बँकेचे व्हॉइस चेअरमन रणजित शिंदे, सुनिल पाटील यांनी शासनाने मिळणारा निधी फक्त धरणाच्या कामासाठीच खर्च करावा, अशी मागणी केली. तसेच, हे धरण अवर्षणग्रस्त पट्ट्यात असल्याने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत तातडीने समावेश करावा यासाठी आग्रह धरला. यासाठी तांत्रिक अडचणी येऊ नयेत, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
मोठ्या आंदोलनाचा इशारा
धरणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी आवश्यक असून, तो लवकर मिळावा यासाठी समिती शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. सरकारने जर योग्य तो प्रतिसाद दिला नाही, तर मोठ्या आंदोलनाची तयारी करण्यात येईल, असेही समितीतर्फे जाहीर करण्यात आले.
मुख्य अभियंता बोरकर यांचा सत्कार
मुख्य अभियंता ज. द. बोरकर यांनी मागील तीन वर्षांपासून या प्रकल्पावर उत्कृष्ट तांत्रिक कामगिरी बजावली आहे. त्यांच्या योगदानाबद्दल पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
