अमळनेरात संत सखाराम महाराज रथोत्सव उत्साहात; सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर : “संत सखाराम महाराज की जय”च्या गजरात आणि वारकरी भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागात बारा बलुतेदारांच्या परंपरेला उजाळा देणारा संत सखाराम महाराजांचा भव्य रथोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. शहरात धार्मिकतेसोबतच सामाजिक एकात्मतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
रथोत्सवाची सुरुवात अभय देव आणि आरती देव यांच्या हस्ते विधीवत पूजा करून करण्यात आली. त्यानंतर हभप प्रसाद महाराज यांनी विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात पूजा-अर्चा करून लालजींची मूर्ती रथावर विराजमान केली. विशेष म्हणजे, सामाजिक सौहार्दाचा आदर्श ठेवत मुस्लिम समाजातील सलीम बेलदार यांना पहिली मोगरी लावण्याचा मान देण्यात आला, ज्यामुळे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
रथावर संत सखाराम महाराजांचा मुखवटा व पादुका, विठ्ठल-रुख्मिणी, संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, तुकाराम महाराज यांसह विविध संतांचे प्रतीक ठेवण्यात आले होते. तसेच गरुड, हनुमान, नगारखाना, घोडेस्वार, मशालधारी आणि भालदार-चोपदार यांच्या सहभागामुळे मिरवणुकीची शोभा अधिक खुलली.
ढोल-ताशांच्या निनादात, टाळकरी व वारकरी “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात रथ मिरवणूक शहरातून मार्गक्रमण करत होती. सुरुवातीला काही अंतर भाविकांनी दोराच्या साहाय्याने रथ ओढला, त्यानंतर ट्रॅक्टरद्वारे मिरवणुकीला गती देण्यात आली. मिरवणुकीदरम्यान हभप प्रसाद महाराज यांच्या हस्ते विश्वस्त, पदाधिकारी व मान्यवरांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी प्रांताधिकारी मयूर भंगाळे, डीवायएसपी विनायक कोते, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, जयश्री पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांच्यासह पथकाने व्यवस्था सांभाळली. तसेच वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक सुरळीत ठेवत अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळवले.
वाडी चौक, गुरव गल्ली, पानखिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशी रोड, पैलाड, कसाली या प्रमुख मार्गांवरून रथ मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी भाविकांनी महाराजांचे स्वागत करून पूजा-अर्चा केली. फरशी पुलावर रथ पोहोचताच फटाक्यांच्या आतषबाजीत उत्सवाचा जल्लोष शिगेला पोहोचला.
रात्रभर चाललेल्या या सोहळ्यानंतर पहाटे रथ पूर्ववत स्थानावर आणण्यात आला. संपूर्ण उत्सवात धार्मिक उत्साहाबरोबरच सामाजिक सलोखा आणि परंपरेचा वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें