
अमळनेर : तालुक्यात अवैध रेती वाहतूक आणि ओव्हरलोड डंपरचा बेजबाबदारपणा दिवसेंदिवस वाढत असून, याकडे संबंधित प्रशासन आणि यंत्रणा मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून कडून होत आहे. दिवसा-धवळ्या अवजड वाहनांची वाहतूक सुरू असतानाही कारवाई होत नसल्याने “यंत्रणा कुंभकर्ण झोपेत आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांकडून अधूनमधून रेतीवाहतूक करणाऱ्या टँकरवर गुन्हे दाखल केले जातात; मात्र ओव्हरलोड डंपरकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे. विशेषतः मुख्य रस्त्यांवरून सुसाट वेगाने धावणाऱ्या डंपरमुळे नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत अशा डंपरमुळे तीन जणांना आपला जीव गमवावा लागला असून, एक जण थोडक्यात बचावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अमळनेर तालुक्यात लवकरच मोठा यात्रोत्सव सुरू होत असून, पुढील १५ दिवसांत ग्रामीण व शहरी भागातील हजारो भाविक मोठ्या संख्येने येथे येणार आहेत. रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी होत असताना, अवजड वाहनांची दिवसरात्र सुरू असलेली वाहतूक मोठ्या अपघाताला आमंत्रण देत आहे.
नागरिकांनी व्यक्त केलेल्या संतापानुसार, ओव्हरलोड डंपर चालक नियमांना धाब्यावर बसवून वाहन चालवत आहेत. अनेकदा स्पीड ब्रेकरवरून जाताना वाळू रस्त्यावर सांडली जाते, ज्यामुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका वाढतो. महसूल विभाग व वाहतूक पोलिसांच्या कार्यालयासमोरूनच ही वाहतूक होत असतानाही ठोस कारवाई न होणे हे गंभीर प्रश्न निर्माण करणारे आहे.
“यंत्रणेच्या नाकावर टिच्चून अवैध वाहतूक सुरू आहे, तरीही अधिकारी मौन बाळगून आहेत. मोठा अपघात झाल्यावरच कारवाई होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सध्या तरी प्रशासनाने तात्काळ कडक पावले उचलून अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवावे, अन्यथा यात्रोत्सवाच्या काळात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.








