
अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)च्या अमळनेर शहराध्यक्षपदी चेतन देवसिंग राजपुत यांची अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली आहे. तरुण आणि सक्रिय नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या राजपुत यांच्याकडे आता शहर संघटनेची धुरा सोपविण्यात आली आहे.
ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली असून जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी त्यास मान्यता दिली आहे. अमळनेर येथे नुकत्याच पार पडलेल्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पवार उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षांपासून शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे मुक्तार खाटीक यांनी स्वेच्छेने पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्या जागी तरुण आणि ऊर्जावान चेहरा म्हणून चेतन राजपुत यांची निवड करण्यात आली.
विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले राजपुत यांनी पत्रकारितेच्या माध्यमातूनही व्यापक जनसंपर्क निर्माण केला आहे. न्यू प्लॉट परिसर विकास मंचचे अध्यक्ष तसेच राजपुत एकता मंचचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. शहरातील संघटनात्मक बळ लक्षात घेता पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीबद्दल विविध स्तरांतून चेतन राजपुत यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.








