
अमळनेर:-
राजकारणाच्या अथांग समुद्रात दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारल्यानंतर माझ्या राजकीय आयुष्याचा सूर्य मावळतीकडे झुकला आहे, अशी जाणीव मनाला पोखरत होती. भविष्य धूसर झाले होते, मनोधैर्य खचले होते, आर्थिक अडचणींनी घेरले होते, आणि जरी शेकडो कार्यकर्ते सोबत उभे होते तरी अंतर्मन एकटं पडलं होतं… अशा काळोख्या क्षणी माझ्या आयुष्यात प्रकाशकिरण बनून आले ते आदरणीय अजितदादा.
पहिल्याच भेटीत त्यांनी माझ्या मनातील वादळ ओळखले. पाठीवर ठेवलेला त्यांचा हात माझ्यासाठी साक्षात देवाचा आशीर्वाद होता. “लढ… मी आहे तुझ्या पाठीशी,” हा त्यांचा आवाज माझ्या नव्या प्रवासाची सुरुवात ठरला. त्यांनी केवळ राजकीय नव्हे तर वैयक्तिक अडचणीही सोडवल्या. खचलेल्या माणसाला उभं करण्याची ताकद त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती.
भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू असताना, केवळ दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेत, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला — आणि जनतेच्या आशीर्वादाने अमळनेरने मला आमदार केलं.
एका सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी केवळ संधी नाही दिली, तर मुख्य प्रतोद, त्यानंतर कॅबिनेट मंत्रीपद देऊन सन्मानित केलं. त्यांच्या पाठबळामुळे निम्न तापी पाडलसरे धरणासारख्या जलसंजीवनी प्रकल्पाला गती देता आली. कोट्यवधींची विकासकामे उभी राहिली. राज्य पातळीवर काम करण्याची संधी त्यांनी दिली. २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा आमदारकीचा मान मिळवताना देखील त्यांच्या आशीर्वादाची सावली माझ्यावर होती.
दादांसारखं नेतृत्व पाठीशी असताना भविष्याची चिंता नव्हती. घटनेच्या आदल्या दिवशीच मुंबईत त्यांची भेट झाली… सकारात्मक चर्चा झाल्या… पण नियतीने क्रूर खेळ खेळला. ती भेट अखेरची ठरली.
२८ जानेवारी २०२६ — हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिला जाईल. बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, आमचे मार्गदर्शक, आमचे आधारवड अजितदादा पवार कायमचे निघून गेले… हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. हा धक्का शब्दांत मावणारा नाही.
दादा केवळ नेता नव्हते — ते एक अखंड कार्यरत असलेले यंत्र होते. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत जनतेसाठी धावणारा असा जननेता दुर्मीळच. स्पष्टवक्तेपणा, निर्णयक्षमता, प्रशासनावरील पकड आणि कार्यकर्त्यांवरील अपार माया — या सगळ्यांचा मिलाफ म्हणजे अजितदादा.
“अनिल, तू काम कर… मी तुझ्या पाठीशी आहे,” हा त्यांचा आवाज आजही कानात घुमतोय… पण तो आवाज आता कायमचा शांत झाला आहे. विकासाचा महामेरू कोसळला आहे. महाराष्ट्र पोरका झाला आहे.
या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण पवार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. सुनेत्रा वहिनी, पार्थ आणि जय यांच्यावर कोसळलेला हा दुःखाचा डोंगर सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो, हीच प्रार्थना.
दादा, तुम्ही देहाने दूर गेलात… पण तुमची शिकवण, तुमचा लढण्याचा बाणा, विकासाची तुमची स्वप्नं — आम्ही कधीच मरू देणार नाही. तुमचा मार्गच आमचा मार्ग असेल.
तुमच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम… भावपूर्ण श्रद्धांजली.
— आपला नम्र,
अनिल भाईदास पाटील
मा. मंत्री (मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन) महाराष्ट्र राज्य
प्रवक्ता – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र
आमदार – अमळनेर विधानसभा मतदारसंघ








