आमदार अनिल पाटील यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

अमळनेर:- राज्य शासनाने इयत्ता ११ वी पाठोपाठ २०२६-२७ पासून इयत्ता १२ वीची प्रवेश प्रक्रियाही ऑनलाईन केल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वातंत्र्यावर मर्यादा येत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. ११ वी विज्ञान शाखेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना १२ वीमध्ये कला किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याची संधी ऑनलाईन प्रणालीमुळे बंद झाली आहे.
यासंदर्भात अमळनेरचे आमदार व माजी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निवेदन देऊन पूर्वीप्रमाणे शाखा बदलाची मुभा देण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, २०२५ पूर्वी ऑफलाईन प्रक्रियेत ११ वी विज्ञाननंतर १२ वीला कला किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश घेता येत होता. तसेच ११ वी वाणिज्यनंतर १२ वी कला शाखेतही प्रवेशाची सुविधा होती. मात्र, नव्या ऑनलाईन प्रणालीमुळे ही लवचिकता पूर्णतः बंद झाली आहे.
“ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे खासगी क्लासेस लावू शकत नाहीत. विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम झेपत नसल्याने अनेकजण १२ वीला कला किंवा वाणिज्य शाखा निवडू इच्छितात. मात्र ऑनलाईन प्रक्रियेमुळे त्यांच्यासमोर अडथळे निर्माण झाले असून विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जाण्याची भीती आहे,” असे पाटील यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व त्यांच्या भविष्यासाठी पूर्वीप्रमाणे ११ वी विज्ञान शाखेनंतर १२ वी कला किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश देण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा व शिक्षण विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते, विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार शाखा निवडण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहणे आवश्यक असून शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे अशी अपेक्षा आमदार अनिल पाटील पाटील यांनी व्यक्त केली आहे.








