उष्माघात कक्षाची तपासणी; उपजिल्हा रुग्णालयाचे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे कडक आदेश
अमळनेर :【अटकाव न्यूज हितेंद्र बडगुजर】 तालुक्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर तसेच ग्रामीण रुग्णालयातील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी रविवारी ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी सुरू असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाची संथ गती, बंद असलेली स्वच्छतागृहे, तुटलेले दरवाजे आणि अस्वच्छ व्यवस्थेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीवर उपजिल्हा रुग्णालयासाठी सुरू असलेल्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करताना काम अत्यंत मंद गतीने सुरू असल्याचे आमदार पाटील यांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना धारेवर धरत कोणत्याही परिस्थितीत पुढील दोन महिन्यांत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले. बांधकामामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेली स्वच्छतागृहे तातडीने सुरू करण्याच्या सूचना देतानाच तुटलेले दरवाजे, दुरुस्तीची कामे आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवरही त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. रुग्णालयातील काही बेडशीट अस्वच्छ आढळून आल्यानेही आमदारांनी नाराजी व्यक्त केली. “रुग्णांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आमदार पाटील यांनी औषधालयासह विविध विभागांना भेट देत रुग्णांना उपलब्ध होणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. प्रत्येक रुग्णाला स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, अशा सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रुग्णालय प्रशासनाला आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याचे निर्देशही देण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे यांनी रुग्णालयातील सुविधा, मनुष्यबळ, औषधसाठा आणि सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा आमदारांना दिला. उष्माघात कक्षाची विशेष पाहणी अमळनेर तालुक्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी रुग्णालयातील उष्माघात कक्षाचीही विशेष पाहणी केली. रुग्णांसाठी कुलर, थंड पिण्याचे पाणी, आवश्यक औषधसाठा आणि अन्य सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. उन्हाळ्यात रुग्णांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पाहणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, विजय पाटील, जयेश पाटील उपस्थित होते. तसेच रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे, डॉ. जी. एम. पाटील, डॉ. संदीप जोशी, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. सुमित पाटील, डॉ. परेश पाटील, बांधकाम अभियंता भागवत माळी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.