पोलिस पाटील गणेश भामरे यांची धाडसी कारवाई – ट्रॅक्टर महसूल दफ्तरी जमा

अमळनेर,:-{ अटकाव न्यूज } तालुक्यातील बाम्हणे गावातील सतर्क पोलिस पाटील गणेश भामरे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त गावात कार्यक्रम आटोपल्यानंतर आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत थेट अवैध वाळू माफियांवर गंडांतर आणले.
पांझरा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीची गुप्त माहिती मिळताच भामरे यांनी वेळ न दवडता ग्रामस्थांना सोबत घेत महसूल व पोलिस विभागाच्या सहकार्याने धाडसी कारवाई केली. यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून पोलिस बंदोबस्तासह अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
कारवाईपूर्वी भामरे यांनी प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा व सपोनि जीभाऊ पाटील यांना तत्काळ माहिती दिली. त्यानंतर बाम्हणे फाटा येथे पोलिस पाटील व ग्रामस्थांनी ट्रॅप लावून ट्रॅक्टरला वेढा घातला. ट्रॅक्टर मालकाने मारहाण झाल्याचा खोटा कांगावा करण्याचा प्रयत्न केला, मात्र गावकऱ्यांनी तो धुडकावून लावला. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु पोलिसांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
घटनास्थळी उपनिरीक्षक विनोद पवार, संजय पाटील, एएसआय सुनिल पाटील, हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, संजय सूर्यवंशी यांनी धाव घेऊन परिस्थिती आवरली. महसूल विभागातील मंडळ अधिकारी पी.एस. पाटील, ग्राम महसूल अधिकारी भूषण पाटील, संदीप माळी, जितेंद्र पाटील, आर.के. पाटील, कल्पेश कुँवर, प्रदीप भदाणे, भूपेश पाटील यांनी पुढील कारवाई पूर्ण करून ट्रॅक्टर वाळूसकट महसूल दफ्तरी जमा केला.
या मोहिमेत पोलिस पाटील गणेश भामरे यांच्यासह सहकारी पोलिस पाटील भाऊसाहेब पाटील (सबगव्हाण), प्रदीप चव्हाण (शिरसाळे खु.), महेंद्र पाटील (ढेकूचारम), दीपक पाटील (ढेकूसिम), कपिल पाटील (भरवस), ग्राम महसूल अधिकारी विकेश भोई (बाम्हणे), ग्राम महसूल सेवक सागर पाटील (बाम्हणे) व सतर्क ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.
महसूल व पोलिस प्रशासनाच्या आदेशाने स्थापन झालेले संयुक्त बैठे पथक – पोलिस पाटील, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम महसूल सेवक यांच्या एकत्रित हालचालींमुळेच या तालुक्यात अवैध वाळू वाहतूक रोखण्यात मोठे यश मिळाले आहे. स्वातंत्र्यदिनासारख्या ऐतिहासिक दिवशी झालेली ही कारवाई प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे आणि गावकऱ्यांच्या सजगतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे.









