रऊफ बँड पथकावर कारवाईसाठी भाजपा अमळनेरचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चोपड्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणामुळे संतापाची लाट; रऊफ बँडच्या गाडीवरही संशय

अमळनेर (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यातील धानोरा येथील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर फसवणूक करून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप अमळनेर शहरातील प्रसिद्ध रऊफ बँड पथकाचा मालक असलम अली (वय 29, रा. सराफ बाजार, अमळनेर) याच्यावर करण्यात आला असून, याप्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा तसेच अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत भारतीय जनता पार्टी अमळनेरच्या वतीने स्थानिक पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले असून, आरोपी व त्याच्या मालकीच्या बँड पथकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गाडीसह पुरावे जप्त करण्याची मागणी
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पीडित मुलीवर अत्याचार करताना रऊफ बँड पथकाच्या गाडीचा वापर करण्यात आला होता. सदर गाडी जिल्हाभर वाहतूक व परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करत फिरत असल्याचाही आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ही गाडी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा करण्याची तसेच तिच्या वापराबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मोबाईल जप्ती व सीडीआर तपासणीची मागणी
गुन्ह्यात सहभागी असलेल्या असलम अली व त्याच्या इतर सहकाऱ्यांचे मोबाईल जप्त करून कॉल डिटेल रेकॉर्ड्स (सीडीआर) तपासावेत, जेणेकरून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करता येईल, अशी मागणीही निवेदनात स्पष्टपणे करण्यात आली आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांना आळा बसेल, अशी भाजपची भूमिका आहे.

शहरात संतापाचे वातावरण
या संपूर्ण प्रकरणामुळे अमळनेर शहरात संतापाची लाट उसळली आहे. भविष्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी जनतेच्या वतीने अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

निवेदन देताना प्रमुखांची उपस्थिती
या निवेदनप्रसंगी भाजपा जानवे मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, मंडल अध्यक्ष राहुल पाटील, भाजपा शहराध्यक्ष योगेश महाजन, माजी नगरसेवक श्याम पाटील, विक्रांत पाटील, संजय पाटील, शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख सुरेश पाटील, युवा मोर्चा देवा लांडगे, समाधान पाटील, अक्षय चव्हाण, दर्पण वाघ, मनोज शिंगाणे, अनिरुद्ध शिसोदे, शुभम पवार, अक्षय पाटील, उज्वल मोरे, विठ्ठल पाटील, प्रेम पाटील, देव गोसावी, संतोष पाटील, संजय पाटील यांच्यासह शेकडो नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलिस प्रशासनाकडून या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाईसाठी हालचाली सुरू असल्याचे समजते.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें